तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:48 PM2022-01-03T14:48:37+5:302022-01-03T14:48:50+5:30

निमित्त ठरले ते श्वानाने या तरुणीच्या घरासमोर केलेल्या घाणीचे

The young woman beat the neighbors and put her hand on the uniform of the police officer in pune | तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात

तरुणीने शेजारच्यांना मारहाण करुन पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला घातला हात

googlenewsNext

पुणे :  तरुणीने शेजारी राहणार्‍या महिलेच्या मुलाला हाताने मारहाण केली. तिच्या आईने कोयत्या सारख्या हत्याराने दोन दुचाकीवर वार करुन त्यांची तोडफोड केली. त्याचे नुकसान केल्यावर तक्रार देण्यासाठी आई व भावासोबत ही २१ वर्षाची तरुणी कर्वेनगर पोलीस चौकीत गेली. तेथे तिची तक्रार नोंदवून घेऊनही तिने महिला पोलीस अंमलदाराला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच चौकीचे प्रभारी पोलीस अधिकारी यांना ‘‘ए तू हो बाजूला’’ असे म्हणून त्यांचे स्टार लावलेल्या फितीला ओढुन बाजूला केले. त्यासाठी निमित्त ठरले ते श्वानाने या तरुणीच्या घरासमोर केलेल्या घाणीचे.

हा प्रकार कर्वेनगरमधील गुरुप्रसाद कॉलनीत रविवारी दुपारी दीड वाजता आणि सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान कर्वेनगर पोलीस चौकीत घडला. याप्रकरणी सुनिता ज्ञानेश्वर दळवी (वय ४५, रा. गुरुप्रसादा कॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजना किरण पाटील (वय ४०) आणि मृणाल किरण पाटील (वय २१, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहण्यास आहे. फिर्यादी यांच्या श्वानाने आरोपीच्या घरासमोर घाण केली. त्याचा राग मनात धरुन मृणाल पाटील ही फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून गेली. फिर्यादींना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. संजना पाटील यांनी कोयत्याने फिर्यादी यांच्या दोन दुचाकीवर वार करुन तोडफोड करुन नुकसान केले.

दुसरी फिर्यादी महिला पोलीस अंमलदार सुषमा घोळवे यांनी दिली आहे. त्यावरुन मृणाल किरण पाटील हिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही भांडणे झाल्यानंतर मृणाल पाटील ही तिची आई संजना व भाऊ आर्यन यांच्यासोबत कर्वेनगर पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आल्या होता. तेथे तक्रार न देता वारजे पोलीस चौकीत गेल्या. वारजे चौकीत तिची तक्रार नोंदवून घेवूनही त्या पुन्हा कर्वेनगर पोलीस चौकीत आल्या. पोलीस माझे काहीही वाकडे करु शकत नाहीत, असे म्हणत असताना फिर्यादी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मृणाल हिने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच कर्वेनगर पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांना ‘‘ए तू हो बाजूला’’ असे म्हणून त्यांचे स्टार लावलेल्या फितीला ओढून बाजूला केले. व फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The young woman beat the neighbors and put her hand on the uniform of the police officer in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.