तरुणीने मित्राकडून घेतले उसने पैसे; परत न केल्याने चाकूने हल्ला, किरकोळ कारणावरून घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:35 IST2025-01-08T11:30:38+5:302025-01-08T11:35:44+5:30
उसने घेतलेले पैसे तरुणीला मागण्यासाठी आरोपी कोयता घेऊन का आला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे

तरुणीने मित्राकडून घेतले उसने पैसे; परत न केल्याने चाकूने हल्ला, किरकोळ कारणावरून घेतला जीव
लोहगाव : पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. येरवडापोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यामुळं तरुणीचा अखेर मृत्यू झाला आहे. आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
तरुणी कु. शुभदा शंकर कोदारे (२८) पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजी नगर भागात वास्तव्यास आहे. ती येरवडा येथील नामांकित आयटी कंपनी WNS कॅाल सेंटर येथे कामाला आहे. या प्रकरणी त्याच कंपनीत काम करणारा तिचा मित्र - कृष्णा सत्यनारायण कनोजा (२८) रा. खैरेवाडी, शिवाजीनगर पुणे याला येरवडा पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा आणि तरुणी एकाच कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तरुणी काम संपवून वाहनतळावर आली. त्यावेळी तिथे असलेल्या कृष्णाने शुभदाला दिलेल्या उसन्या पैशावरून वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपास गेला की त्याने तिच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. तरुणीने आरडाओरडा केल्याने तिथले सुरक्षारक्षक आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली.
आरोपीने आर्थिक वादातून तरुणीवर हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. वाद विवादावरून धारदार हत्याराने तिच्या उजव्या कोपरावर वार करून गंभीर जखमी केले होते. सदर जखमी मुलगी उपचारादरम्यान सह्याद्री हॉस्पिटल येरवडा येथे मृत्यू झाला. आरोपीने चाकू लपवून आणला होता. किरकोळ कारणासाठी चाकू का आणला? याबाबत चौकशी सुरू केली आहे. सदर मुलीची बहीण नामे - साधना शंकर कोदरे, 26 वर्षे हिच्या फिर्यादीवरून गुन्हा कलम - 103(1) BNS 4, 25 हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके व सहकारी पोलिस करीत आहेत.