कळंबला विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:23+5:302021-08-17T04:18:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडीवस्तीवर शुभांगी संजय भालेराव (वय १९) या तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू ...

Young woman dies after falling into Kalambala well | कळंबला विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

कळंबला विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडीवस्तीवर शुभांगी संजय भालेराव (वय १९) या तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १६) रात्री घडली. बिबट्या मागे लागल्याने ही तरुणी विहिरीत पडल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली.

शुभांगी भालेराव ही तरुणी वीजपंप सुरू करण्यासाठी शेतातील विहिरीवर गेली होती. ती बराच वेळ घरी परतली नाही. शेजाऱ्यांनी तिला विहिरीकडे जाताना पाहिले होते. याबाबतची माहिती कुटुंबीयांना देताच त्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. शुभांगी भालेराव हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जखमा आढळून आल्याने बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या घटनेचा तपास मंचर वनविभाग अधिकारी करीत आहेत. शुभांगी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात विहिरीत पडून शुभांगी संजय भालेराव या तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तर वनखात्याने तपासानंतर मृत्यूचे मूळ कारण पुढे येईल असे सांगितले आहे. घटनास्थळी मंचर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच कळंब येथील माजी सभापती वसंतराव भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, उद्योजक नितीन भालेराव यांच्यासह वाडीवस्तीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट

शुभांगी भालेराव हिचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या भागात बिबट्याचा वावर असतो. या तरुणीच्या चेहऱ्यावर, कानावर जखमा आहे. मात्र, त्या जखमा खोलवर नाही. ती वीज पंप सुरू करण्यासाठी विहिरीवर गेली होती. यामुळे तिचा मृत्यू विहिरीत पडून झाला ? विजेचा धक्का बसून झाला अथवा बिबट्याच्या हल्ल्यात झाला याची ठोस माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढे येईल.

बळवंत मांडगे, पोलीस निरीक्षक

कोट

ही तरुणी विहिरीत पडली होती. तिच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल व पोलिसांचा तपासातील निष्कर्ष पुढे आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

- नारायण आरूडे, वनपाल

फोटो आहे

Web Title: Young woman dies after falling into Kalambala well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.