जीवनसाथी शोधण्याच्या नादात तरुणीने गमावले ६ लाख
By भाग्यश्री गिलडा | Published: October 13, 2023 03:41 PM2023-10-13T15:41:36+5:302023-10-13T15:42:13+5:30
जीवनसाथी डॉट कॉम वरून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे
पुणे: मुंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला आपला जीवनसाथी शोधणे चांगलेच महागात पडले आहे. जीवनसाथी डॉट कॉम वरून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ जून २०२३ ते २२ जून २०२३ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी केशवनगर परिसरात राहणाऱ्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रारदार तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावरून जोडीदार शोधण्याचा प्रयत्न केला. जीवनसाथी आयडीधारक विरेंद्र जैन याच्याशी तरुणीचा संपर्क झाला. त्यावेळी विरेंद्र याने लग्नासाठी तयार असल्याचे दर्शवले. लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी पैश्यांची मागणी केली. विरेंद्र जैन याने सांगितल्याप्रमाणे तक्रारदार महिलेने एकूण लाख २२ हजार रुपये पाठवले. काही कालावधी उलटल्यावर आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तरुणीने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत जबाब दिला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.