पुण्यातील तरुणीला घातली ‘रॉ’ची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:29+5:302021-07-10T04:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका २८ वर्षीय तरुणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत, हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील एका २८ वर्षीय तरुणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत, हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे, अशी बतावणी करून तिच्यावर भारतातील ‘रॉ’ची नजर असल्याची भीती घालण्यात आली आणि तिच्याकडून ८ लाख ३७ हजारांची रोकड आणि आयफोनसह १० लाखांची फसवणूक केली, हा धक्कादायक प्रकार एप्रिल ते जून कालावधीत उघडकीस आला आहे.
तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अमित चव्हाण (वय ३०) याला ताब्यात घेण्यात आले आहे. फिर्यादी तरुणी फॅशन डिझायनर आहे. आरोपीने काही दिवसांपूर्वी बेटर हाफ सोशल मीडियाद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर राहुल पाटील असे खोटे नाव सांगून ओळख वाढल्यानंंतर त्याने फिर्यादीला अमेरिकेत इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगून, त्याच्या देखरेखाली दुबई, अमेरिका, हिंदुस्थान असल्याची बतावणी केली. आम्ही १५४ देश हँंडल करतो. हिंदुस्थानामध्ये आम्ही तपासासाठी आलो आहोत. तुझ्यावर ‘रॉ’ची नजर आहे, अशी भीती त्याने फिर्यादीला दाखविली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्यास सांगून तिचे सिमकार्ड घेतले. तरुणीने व्यवसायासाठी आणलेले पैसे घेऊन, मित्राच्या सुरत आणि गुजरातच्या टेक्स्टाईल मिलमधून कमी किमतीत आणि लवकर मटेरिअल मिळेल, असे आमिष दाखवित वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तिच्याकडून रक्कम घेतली. त्यामध्ये ८ लाख ३७ हजारांच्या रोकडसह १ लाख २८ हजारांच्या लॅपटॉपचा समावेश आहे. तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे करीत आहेत.
-----------------------------------