तरुणाचे विवस्त्र व्हिडिओ व्हायरल करण्याची तरुणीची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:20+5:302021-09-17T04:16:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फेसबुक अकाऊंटवर झालेल्या मैत्रीनंतर विवस्त्रावस्थेतील व्हिडिओ कॉलचे स्क्रिन रेकॉर्डिंग करून, तो व्हायरल करण्याची धमकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फेसबुक अकाऊंटवर झालेल्या मैत्रीनंतर विवस्त्रावस्थेतील व्हिडिओ कॉलचे स्क्रिन रेकॉर्डिंग करून, तो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीने तरुणाकडून तब्बल साडेपाच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी धानोरीत राहणाऱ्या ३५ वर्षांच्या तरुणाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २९ मे २०२१ रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिनत शर्मा असे नाव धारक करणाऱ्या तरुणीने फिर्यादीबरोबर फेसबुक अकाऊंटवरून मैत्री केली. तिने फेसबुक मेसेंजरवर व्हिडिओ कॉल केला. त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. तिने फिर्यादीलाही तसे करण्यास सांगितले. तिच्या सांगण्याप्रमाणे त्याने कृती केल्यावर तिने या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवले. त्यानंतर फिर्यादीला तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी वेळोवेळी फिर्यादीकडून दोन बँक खात्यात ५ लाख ५४ हजार १०० रुपये खंडणी स्वरुपात पाठविण्यास सांगितले, असा आरोप आहे. साडेपाच लाख रुपये दिल्यानंतरही तिची मागणी न थांबल्याने शेवटी या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.