बेकायदा बांधकामाची तक्रार जिवावर बेतली; औंधमध्ये दूध विक्रेत्या तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:56 AM2018-11-01T08:56:26+5:302018-11-01T12:00:20+5:30
औंधमधील कस्तुरबा वसाहतीत दूध घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर सपासप वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता घडली.
पुणे : बेकायदेशीर बांधकामाबाबत केलेल्या तक्रारीवरुन झालेल्या वादातून गुरुवारी सकाळी औंध येथील कस्तुरबा वसाहतीत दूध घालणाऱ्या तरुणावर काही जणांनी कोयत्याने वार करुन त्याचा निर्घृण खून केला.
रोहित अशोक जुनवणे (वय २८, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) असे त्याचे नाव आहे. औंध येथील एका मॉलच्या अनधिकृत बांधकामाबाबत रोहित जुनवणे याने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. परंतु ही माहिती संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला मिळाल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्याचबरोबर माथाडी कामगारांमधील वचर्स्वातून त्याचे माथाडी नेते दादा मोरे यांच्याबरोबरही तीन दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यांच्या घराबाबतही जुनवणे याने तक्रार दिली होती.
रोहित याच्यावर एका २२ वर्षांच्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी हा प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. रोहित यांच्या डोक्यात १०च्या वर वार करण्यात आले असून, त्याने हा हल्ला वाचविण्यासाठी हात मध्ये घातल्याने त्याच्या दोन्ही हाताची बोटे तुटली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जुनवणे हा दूध घालण्याचे काम करतो. दूध घालण्यास जाण्याअगोदर तो वस्तीतील मंदिरात दर्शनासाठी जात असतो. ही बाब हल्लेखोरांना माहिती होती. ते त्याची वाट पहात दबा धरुन बसले होते. रोहित आल्यानंतर काही जणांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यांच्या डोक्यात अनेक जखमा झाल्या. त्याच्या हाताची बोटेही तुटली होती.
सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रोहितला नागरिकांनी तातडीने जवळच्या हॉस्पिटलला नेले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे व त्यांच्या सहकाऱ्यानी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.