तरुणांना पडतोय हृदयरोगाचा विळखा, बदलती जीवनशैली ठरतेय कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:42 PM2018-05-07T19:42:31+5:302018-05-07T19:46:09+5:30
तरुणांना होणाऱ्या हृदयरोगात वाढ होत असून हे विदयार्थी दशेतच हृदयरोग त्यांच्यात भिनत चालला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या हृषीकेश आहेर या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारे आहे. यामुळे तरुणांच्या हृदयरोगाचे प्रमाण वाढत असण्याच्या विषयाकडे पुन्हा गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या हृषीकेश आहेर या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारे आहे. यामुळे तरुणांच्या हृदयरोगाचे प्रमाण वाढत असण्याच्या विषयाकडे पुन्हा गांभीर्याने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून बदलती जीवनशैली तरूणांसाठी घातक ठरू लागली आहे. विविध कारणांमुळे वाढणारा ताण-तणाव, धुम्रपान, खाण्याच्या सवयी यांसह आरोग्याकडे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक तरूणांना हृदयरोगाचा विळखा पडत आहे. विविध अभ्यासांनुसार, भारतात हे प्रमाण वेगाने वाढत चालले असून २५ ते ३० वयोगटातील तरूणांमधील हृदयरोगाचे प्रमाण अधिक आहे.
जगातील सर्वाधिक तरूण असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. पण ही तरूणाई बदलत्या जीवनशैलीची बळी ठरू लागली आहे. मागील काही वर्षांत तरूणांमध्ये वाढत जाणाऱ्या हृदयरोगाचे प्रमाण धोक्याची घंटा ठरू लागली आहे. अमेरिका, चीन, जपानच्या तुलनेत भारतातील तरूणांना हा धोका कितीतरी पटीने अधिक आहे. तरूणींच्या तुलनेत तरूणांमध्ये हे प्रमाण अधिक असण्याचे प्रमुख कारण धुम्रपान हे ठरत आहे. जीवनशैली बदलल्याने तरूणांमध्ये धुम्रपान, मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तसेच बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी जेवण व पुरेशी झोपही मिळत नाही. आरोग्याकडेही दुर्लक्ष होत असून वेळच्या वेळी तपासण्या केल्या जात नाहीत. त्यामुळेही हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत कोकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयामध्ये दर महिन्याला २५ ते ३० या वयोगटातील किमान दोन तरूणांवर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया केली जाते. चार-पाच वर्षापुर्वीपर्यंत हे वय ४५ पर्यंत होते. आता हे सातत्याने कमी होत चालले आहे. समाजातील एकुण हृदयविकाराचे झटके येणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्याही लक्षणीय आहे. बदलती जीवनशैली त्यास कारणीभुत आहेच. मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, शरीराची फारशी हालचाल नसणे, खाण्या-पिण्याची सवयींचाही परिणाम आहे. पुर्वी धुम्रपान, मधुमेह या कारणांमुळे हृदयरोग होत होता. पण आता मानसिक ताण-तणाव प्रमुख कारण होऊ लागले आहे.
याबाबत लोकमतने काही तरुणांशी काही तरुणांशी बातचीत केली.मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या ऐश्वर्या जोशी हिने बोलताना व्यायाम कमी होत असल्याचे सांगितले. मात्र आजचे उदाहरण बघितल्यावर काळजी घेण्याची गरज निर्माण झाल्याचे जाणवत आहे असेही ती म्हणाली. एवढंच नाही तर मी आजपासून व्यायाम करणार असल्याचा निश्चय तिने व्यक्त केला. १२वीमध्ये शिकणाऱ्या नुपूर माने हिने आम्ही दररोज इतके बिझी असतो की त्यातच व्यायाम होतो असं मला वाटायचं. पण आता तसा विचार न करता मी वेळ काढून सायकलिंग करणार आहे. अक्षय यादव या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने रोज अभ्यास करताना मी योगा आणि चालण्याचा व्यायाम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे शरीरासोबत मनालाही तजेला मिळतो असे आवर्जून नमूद केले.
जीवनशैलीत हवा असा बदल
वेळेत जेवण आणि नाश्ता करण्याची गरज
चहा, कॉफी आणि शीतपेय पिणे टाळणे
आरोग्यदायी पदार्थ सेवन करण्यास प्राधान्य
दारू, सिगारेटसह कोणत्याही व्यसनाला नकार
उशिरापर्यंत जागण्यापेक्षा सकाळच्या अभ्यासावर भर
सलग अभ्यास न करता मध्ये मध्ये हवी विश्रांती
एकाग्रतेसाठी योगासने व ध्यानधारणेची उपासना
रोज पुरेशी झोप घेण्याची गरज