निष्काळजीपणा भोवला ना...हरवलेल्या सिमकार्डची तक्रार न दिल्याने तरूण नायडूत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 05:59 PM2020-04-03T17:59:18+5:302020-04-03T18:07:23+5:30
निजामुद्दीन मरकजशी संबंधाच्या संशयावरून कोरोना चाचणी
जुन्नर : वर्षभरापूर्वी मोबाईलच्या हरविलेल्या सिमकार्डची पोलिसांकडे तक्रार न केल्याचा निष्काळजीपणा एका तरूणाच्या चांगलाच अंगलट आला. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन दिल्ली येथील तबलीगी मरकज येथील कार्यक्रमात आढळल्याने तपासणीसाठी आरोग्य विभागाने त्याला थेट नायडू रूग्णालयात भरती केले. सुदैवाने त्याची चाचणी निगेटीव्ह आली. या नंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, या प्रकरणामुळे तरूण चांगलाच घाबरला आहे. दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणाशी कोणताही थेट संबध नसताना निष्काळजीपणाने वागल्याने या युवकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले.
कोरोना रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि देशातील राज्य सेवा २४ तास काम करत आहेत. आरोग्य विभाग हाय अलर्टवर आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी मरकज येथील कार्यक्रमात अनेक पॉझिटीव्ह रूग्ण सापडले. या कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक जण संपूर्ण देशात गेले आहेत. त्यांची शोध मोहिम सुरू आहे. पुण्यातूनही अनेक जण दिल्ली येथे जाऊन आल्याने प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत. पुण्यातील नागरिकांची प्रशासनाने यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात त्या तरूणाचा मोबाईल क्रमांक असल्याने पोलीसांनी त्याला बोलावून घेतले. तसेच तु दिल्ली येथे कार्यक्रमात असल्याने तुझी तपासणी करावी लागेल असे सांगितले. यावर तरूणाने मी दिल्लीत कधी गेलो नसल्याचे सांगितले. माझा, हा नंबर जुना असून त्याचे सीम कार्ड हरवले असल्याचे सांगितले. मात्र, पोलीसांनी त्याला पुण्यात नायडू रूग्णालयात पाठवून त्याची तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. यानंतर पोलीसांनी त्याला घरी सोडले.
पोलीसांनी या सर्व प्रकरणानंतर शोध घेतला. यादीतील मोबाईल क्रमांकावर पोलीसांनी फोन केला. मात्र, संबंधित व्यक्ती फोन न उचलत असल्याने कॉल डायव्हर्ट होऊन या तरूणाला लागला. ज्याकडे या तरूणाचे सीम आहे तो सध्या दिल्ली येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करत असल्याचे समजते. हा व्यक्ती दिल्ली येथील कार्यक्रमात संबधित व्यक्ती फोटो काढण्यासाठी हा गेला असल्याचा संशय आहे. या प्रकरणामुळे तरूण आणि प्रशासकीय यंत्रणेची मात्र, चांगलीच धावपळ झाली.
चौकट
निजामुद्दीन मरकज प्रकरणी शासच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत खोडद येथील एका युवकाचा देखील नाव असल्याचे पुढे आला आहे. शासनाने जुन्नर येथील युवकाची करोना संबधित तपासणी करून घेतली. मात्र, हा तरूण तेथे गेलाच नसल्याने, दिल्ली येथील व्यक्तीचा शोध घेऊन त्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. या व्यक्तीने आपला फोन बंद करून ठेवला असल्याने त्याचा शोध घेणे यंत्रणेपुढे आव्हान ठरणार आहे.