तुमची मुले ऑनलाईन लैंगिक शोषणाचे तर बळी नाहीत ना! ‘वुई प्रोटेक्ट' चा धक्कादायक अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 02:13 PM2023-10-21T14:13:06+5:302023-10-21T14:14:49+5:30
‘वुई प्रोटेक्ट' च्या ग्लोबल थ्रेट असेसमेंटचा अहवाल...
- नम्रता फडणीस
पुणे : तुमची मुले-मुली ऑनलाईन लैंगिक शोषणाचे बळी नाहीत ना! लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन दिला तर ती काय करतात?, याकडे तुमचं लक्ष आहे का? एखाद्याशी चॅटिंग किंवा गेमिंगच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी मैत्री वाढते. अशावेळी आपली मुले-मुली ऑनलाईन शोषणाचे शिकार ठरू शकतात. त्यामुळे सावधान!
‘वुई प्रोटेक्ट' या ग्लोबल अलायन्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल थ्रेट असेसमेंटच्या अहवालातील आकडेवारी धक्कादायक आहे. यात इंटरनेटवरील बालशोषण कंटेंटमध्ये ८७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यानुसार जागतिक स्तरावर बालकांच्या शोषणाची ३२ दशलक्षाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत
जागतिक लोकसंख्येनुसार ६४. ६ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात तर ५९.९ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. त्यात अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश आहे. ही अल्पवयीन मुले-मुली या आभासी विश्वात रमल्याचे चित्र आहे. या अहवालात मुलांच्या सोशल मीडिया व इंटरनेटच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे तसेच यातील धोके नमूद केले आहेत.
काय सांगतो अहवाल?
मुलांच्या शोषणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढला आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीपासून गुन्हेगारांनी लहान मुलांची लैंगिक शोषण सामग्री तयार करणे व मुलांचे शोषण करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर केल्याची प्रकरणे वाढत आहेत. मुलांच्या आर्थिक लैंगिक छळातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०२१ मध्ये मुलांकडून खंडणी उकळण्याची १३९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर २०२२ मध्ये ही संख्या १० हजारांपेक्षाही जास्त झाली. या घटनांमध्ये मुलांचे लैंगिक फोटो आणि व्हिडिओ प्राप्त करणे. ते व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे आदीं प्रकार समोर येत आहेत. यासाठी १५-१७ वर्षे वयोगटांतील मुलांशी प्रामुख्याने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला जातो. त्यांच्याकडून फोटो, व्हिडिओ प्राप्त करून त्यांना धमकी दिली जाते. त्यात मुलांपेक्षा मुलींचे लैंगिक शोषणाचे प्रमाण अधिक आहे.
लैंगिक शोषणाचा काय परिणाम होतो?
लैंगिक शोषणामुळे मुलांची जीवनशैली बदलते, नैराश्य आणि एकटेपणा, अस्वस्थता असे मानसिक परिणामही मुलांमध्ये दिसून येतात. वयात आल्यावर या मुलांमध्ये नातेसंबंधांविषयी नकारात्मकताही जाणवत असल्याचे अहवाल सांगतो.
पुण्यातही काही घटना उघडकीस
पुण्यातही अशा काही घटना अल्पवयीन मुला-मुलींबाबत घडल्या आहेत. दिल्लीमधील एका व्यक्तीशी मुलाची गेमच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने मुलीचे न्यूड फोटो मागितले. ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन मुलीला ब्लॅकमेल केले. अखेर त्या आरोपीला पकडण्यात यश मिळाले.
पालकांचा मुलांशी संवाद हवा
सोशल मीडियावर अकौंट उघडून आपली कौटुंबिक माहिती देण्याबरोबरच गेमिंग आणि चॅटिंगच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कांत आल्यानंतर त्या व्यक्ती मुलांशी मैत्री वाढवतात. त्यांचे शोषण सुरु करतात. निरागस वयातील मुले त्यांच्या जाळ्यात आपोआप अडकतात. मुलांमधील बदल टिपणे आणि त्यांच्याशी सतत संवाद ठेवणे हे पालकांसाठी गरजेचे असल्याचे सायबर अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
* तेरा वर्षांच्या आतील मुलांच्या हातात शक्यतो मोबाईल देऊ नये.
* मुलं जेव्हा मोबाइल, टॅब वापरतात, तेव्हा नेमकं कोणत्या साइटवर असतात, यावर लक्ष ठेवणं.
* मोबाइलमधील इंटरनेट वापराची हिस्ट्री चेक करणे.
* मुलांच्या वागण्यात बदल झाला असेल, तर तो का झाला असावा?, याचा अभ्यास करणं
* मुलांना एकटं न सोडता सतत त्यांच्याशी संवाद ठेवावा.