"सत्तेत आल्यापासून तुमचे पाय हवेत गेले आहेत, ते जमिनीवर राहणं यातच आनंद.."; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:34 PM2021-05-21T18:34:27+5:302021-05-21T18:46:49+5:30
उद्धव ठाकरे यांनी मी हवाई नाहीतर जमिनीवरून पाहणी दौरा करतोय अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे...
पुणे : ’माझा हवाई नव्हे जमिनीवरून प्रवास आहे’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात...तुमचे पाय हे तुमचे सरकार आल्यापासून हवेत गेले आहेत. ते जमिनीवर राहणं याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आनंद आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौरा केल्यावरून राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे, याविषयी छेडले असता पाटील म्हणाले की,ते दोघेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आढावा घेण्यासाठी त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा केला. त्यांना आढावा घेण्याचे अधिकार आहेत.विरोधी पक्षनेत्याचे पद हे मुख्यमंत्र्यांच्या समान पातळीवरचे मानले जाते. दोघांनी ठाणे, पालघर जिल्हयातल्या कोळी बांधवांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हे ते बाहेर पडले. दीड वर्षांनी बाहेर पडल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना उपदेश करण्याचे कारण नाही. तुमचे पाय जमिनीवर आहेत यात आनंद आहे. फडणवीस आणि दरेकर यांनी हवाई प्रवास केलेला नाही. पंतप्रधान हे एक असे पद आहे की त्यांच्याबाबत धोका पत्करणं अवघड असतं. त्यामुळे आणि अधिकारात राहून पाहणी करायची असेल तर हवाई मार्ग हीच परंपरा आहे असे सांगत त्यांनी पंतप्रधानांच्या हवाई दौऱ्याची पाठराखण ही केली.
पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा करत आर्थिक पॅकेज जाहीर करून
महाराष्ट्राबाबत दुजाभाव केल्याची टीका केली जात आहे, त्याविषयी विचारले असता पाटील म्हणाले, या सगळ्या अर्थाने वावड्या आणि अनावश्यक चर्चा असतात.
हवाई प्रवास करताना हवामान खात्याने महाराष्ट्राच्या सागरी पट्ट़्यात
येणे सोयीचे नाही अशी सूचना केली होती. त्यामुळे त्यांनी गुजरात दौरा
केला. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांची पाहाणी केली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांना सूचना केल्या आहेत की पंचनामे करा आणि राज्यांच्या झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव सादर करा. त्यामुळे फक्त गुजरातला आर्थिक पॅकेज जाहीर केलं यात काहीही तथ्य नाही.
--------------------------------