"तुमच्या नवऱ्याला उचललंय, २ करोड तयार ठेवा..", पुण्यातून दिवसाढवळ्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:25 IST2025-03-04T09:24:03+5:302025-03-04T09:25:34+5:30
व्यापाऱ्याने जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे

"तुमच्या नवऱ्याला उचललंय, २ करोड तयार ठेवा..", पुण्यातून दिवसाढवळ्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण
किरण शिंदे
पुणे: दोन करोड रुपयांसाठी पुणे शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले. बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिऱ्याचे व्यापारी हिरे घेऊन त्यापासून दागिने तयार करण्याचे काम करतात. सोमवारी सायंकाळी पती-पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिस्बरी पार्क परिसरात गेले होते. शाळेतून घेतल्यानंतर त्यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवले आणि काही कामानिमित्त कॅम्पात जात असल्याचे सांगून निघून गेले.
दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या मोबाईलवर व्यापारी यांच्या मोबाईल वरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने "मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुर जी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे" असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीच्या पतीने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
तपासा दरम्यान त्यांचे शेवटचे लोकेशन नवले पूल परिसरात आढळून आले आहे. याशिवाय तिथं हे वापरत असलेली दुचाकी देखील त्याच परिसरात आढळली आहे. त्यानुसार पोलीस आता त्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे हिरे व्यापारी हे मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात असल्याची ही माहिती समोर आली आहे. याशिवाय जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणामागे आणखी दुसरी काही बाजू आहे का याचा देखील तपास पुणे पोलीस घेत आहेत.