मरणानंतरही तुमचा नवरा घरात फिरत आहे....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:46 PM2019-12-30T17:46:14+5:302019-12-30T17:52:24+5:30
वृद्ध महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन एक महिला आणि तिच्या मित्राने केली मोठी आर्थिक फसवणूक.
पुणे : मरणानंतरही तुमचा नवरा घरामध्ये फिरत आहे सांगून वृद्ध महिलेचे २० लाख रुपये लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याबाबत फडवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्याचा अंतर्गत अलंकार पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील नवसह्याद्री सोसायटीत ही घटना घडली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वेदिका निलेश कामत उर्फ नेहा निलेश पै (वय ३८), तिचा मित्र वीर (वय -४२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या विषयी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित महिलेने वृद्धेशी ओळख निर्माण केली. तुम्ही माझ्या आज्जीसारख्या दिसता सांगून त्यांचा व्हॉट्स ऍप क्रमांकही मिळवला. त्यानंतर विविध कारणांनी ती त्यांच्या संपर्कात राहिली. या वृद्ध महिलेचे दोनही मुले परदेशी रहात असल्याने त्या बंगल्यात एकट्याच राहतात हेही तिने जाणून घेतले. पुढे वृद्ध महिलेशी बोलून त्यांना घराखालील दोन खोल्या भाड्याने देण्याचे माहिती करून घेतले आणि थेट मित्राला घेऊन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात धूप लावून वातावरण निर्मिती केली आणि वृद्धेला तुमचा दिवंगत नवरा घरात फिरत असल्याचे सांगून घाबरवले. इतक्यावर न थांबता त्यांच्या दोनही मुलांचा मृत्यू होणार असल्याचे सांगून आत्मविश्वास कमी केला.
पुढे संबंधित महिलेने वृद्धेच्या घरात प्रवेश करून खोल्या तोडण्यास सुरुवात केली. स्वतःचे व मित्राचे सामनही तिने घरात आणून ठेवले. शिवाय त्या तोडफोडीच्या नावाने खर्च झालेले पैसे वृद्धेकडून मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यावर ती स्वतः त्यांच्यासोबत गेली व विविध खात्यातून व ठेवीतून असे मिळून सुमारे २० लाख ९० हजार रुपये काढून घेतले.या प्रकरणी संबंधित वृद्ध महिलेचा मुलगा भारतात आल्यावर त्याने तक्रार दाखल केली आहे.