तुमची अलिशान घरे, गाड्या खाेक्यातूनच आले आहेत ना? दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर पलटवार
By प्रशांत बिडवे | Published: May 26, 2023 04:33 PM2023-05-26T16:33:02+5:302023-05-26T16:33:51+5:30
संजय राऊतांनी स्वत:ला विकावे, आम्ही काेणी स्वत:ला विकलेले नाही
पुणे : राऊतांनी आमच्यावर केलेले आराेप सिध्द करून दाखवावेत. त्यांनी स्वत:ला विकावे, आम्ही काेणी स्वत:ला विकलेले नाही. पहिल्यांदा आपल्या आमदारांचा मान ठेवायला शिका, लाेकप्रतिनिधी काय मान असताे याची जाणीव नसेल तर राजकीय पक्ष का स्थापन केला? शिंदे हे मदतीला आल्यानेच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहाेत. तुमचे अलिशान घरे आणि गाड्या या खाेक्यातूनच आल्या आहेत ना ? अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. पुणे विद्यापीठात एनएसएस अधिकारी अधिवेशनानंतर केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिंदे गट हा काेंबड्याचा खुराडा असल्याचे विधान राऊत यांनी केले आहे त्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता केसरकर म्हणाले, राऊत राेज वेगवेगळी विधाने करतात. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. हे तुम्ही त्यांना नीट विचारून घ्यावे. दरम्यान, विनायक राउतांनी तुम्हाला पराभूत करू असे आव्हान दिले आहे मात्र, विनायक राऊतांना निवडून आणण्यात केसरकर यांचा वाटा असल्याचे त्यांनी स्वत: तसेच कनकवली येथील सभेत उध्दव ठाकरेंनी स्टेजवर सांगितले आहे. पक्षाने निर्णय घेतल्यानंतर राऊतांविराेधातही उभा राहील असेही केसरकर म्हणाले.
लाेकसभा निवडणूक मिळून लढू
आमचा धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणाशिवाय कमळाला ताकद येत नाही. आमची युती मजबूत असून लाेकसभा निवडणूकीसाठी व्यवस्थित जागा वाटप हाेईल आणि साेबत निवडणूक लढवू. जागा वाटपाबाबत शिंदे, फडणवीस यांच्यासह नरेंद्र माेदी आणि अमित शहा हे वरीष्ठ नेते मिळून निर्णय घेतील. शिवसेना आमचा पक्ष असून धनुष्यबाणही आमचा आहे त्यावर निवडणूक आयाेगाने शिक्कामाेर्तब केले असून विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. आमच्याकडे तेरा खासदार आहेत त्यामुळे उर्वरित खासदार लवकरच आमच्याकडे येतील.