'तुमच्या पोपटाच्या शिट्ट्यांचा आम्हाला त्रास होतो', पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची पोलिसात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 02:44 PM2022-08-07T14:44:51+5:302022-08-07T14:45:01+5:30
खडकी पोलीस ठाणे गाठले. सध्या उत्सवाचा काळ सुरु असल्याने पोलिसांनी तातडीने याची दखल घेतली
पुणे : अनेकांना कुत्री मांजरी पाळण्याचा शौक असतो. कुत्रे चावल्यावरुन सध्या अनेक तक्रारी होत आहेत. कुत्र्याच्या मालकांवर पोलीस गुन्हेही दाखल करीत आहेत. मात्र, पोपटाचे बोल हे मिठु मिठु म्हणून नेहमीच कौतुकाचे ठरले आहे. अशाच पोपटाच्या शिट्ट्या मात्र दोघांमध्ये वादाचे कारण झाले. त्यातून चक्क त्यांच्या भांडणे झाली. ती भांडणे पोलीस ठाण्यापर्यंत गेली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजीनगरमधील महात्मा गांधी वसाहत आहे. तेथे राहणाऱ्या एकाने पोपट पाळला आहे. पोपटाचा पिंजरा त्याने घराबाहेर टांगला होता. पोपट सतत शिट्ट्या मारतो. मात्र, त्याच्यासमोर राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला त्याचा त्रास होऊ लागला. त्याने पाेपटाच्या मालकाला तुमच्या पोपटामुळे आम्हाला त्रास होतो. तुम्ही तो दुसरीकडे कुठेतरी ठेवा, असे सांगितले. त्याचा पोपटाच्या मालकाला राग आला. त्याने या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. त्यांना मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने ज्येष्ठ नागरिक घाबरुन गेले, त्यांनी तातडीने खडकी पोलीस ठाणे गाठले. सध्या उत्सवाचा काळ सुरु असल्याने पोलिसांनी तातडीने याची दखल घेतली. अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.