आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; मंगळवार पेठेतील घटना
By नितीश गोवंडे | Published: July 23, 2024 11:01 AM2024-07-23T11:01:00+5:302024-07-23T11:01:11+5:30
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : आंदेकर टोळीतील गुंडाने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वैभव चंद्रकांत गंगणे (२६, रा. सुमीत हाईट्स, १२७८, कसबा पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ देवदत्त आंदेकर (२५, रा. नाना पेठ) याला अटक करण्यात आली. त्याचे साथीदार गणेश अशोक वड्डू, आयुष बिडकर (दोघे रा. नाना पेठ), जयेश लाेखंडे (रा. मंगळवार पेठ), पंकज वाघमारे (रा. हडपसर) यांच्यासह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गंगणे याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंगणे आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. सोमवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास गंगणे आणि त्याचा मित्र मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंप परिसरातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्याला गाठले.
शिवीगाळ करून आरोपींनी मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, फरासखाना विभागाचे सहायक आयुक्त ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.