सिंहगडावरील पायवाटेत तरूण-तरूणीवर कोयत्याने हल्ला; तरुणीची सोन्याची साखळी हिसकावली
By श्रीकिशन काळे | Published: April 17, 2023 05:17 PM2023-04-17T17:17:46+5:302023-04-17T17:17:59+5:30
तरुणाने ओरडून 'तुम्हाला जे पाहिजे, ते घ्या पण आम्हाला सोडा' असे सांगून दोघांचा बचाव केला
पुणे: सिंहगडावर आतकरवाडीतून जाणाऱ्या तरूण-तरूणीवर दोन अज्ञातांनी काठी व कोयत्याने हल्ला करून त्यांना लुटले. त्यांच्याकडील सोन्याची साखळी व रोख रक्कम हिसकावून घेतली. ही घटना रविवारी दुपारी घडली. पायवाटेवरून जाताना पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण आहे.
या विषयी हवेली पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. विवेककुमार बाबुलाल प्रसाद (वय २८, रा. ससाणेनगर, हडपसर) हा तरुण आपल्या मैत्रिणीसह आतकरवाडीतून पायवाटेने सिंहगडावर चालत होता.
दुपारची वेळ होती. खूप उन्ह असल्याने त्या परिसरात कोणी नव्हते. चालताना एका ठिकाणी दोन तरूण त्यांना दिसले. दोघेही त्यानंतर पुढे चालू लागले. तेव्हा दोन व्यक्तींनी विवेककुमार याच्यावर कोयत्याने व काठीने हल्ला केला. तेव्हा त्याच्या हातातून रक्त येऊ लागले. विवेककुमारने ओरडून तुम्हाला जे पाहिजे, ते घ्या पण आम्हाला सोडा, असे सांगितले. तरूणीच्या गळ्यातील साखळी एकाने ओढून घेतली. रोख रक्कम व इतर ऐवज असा मिळून काही हजारांचा माल त्यांनी हिसकावून नेला. ते पळून गेल्यानंतर विवेककुमारने पोलीसांना फोन केला आणि सर्व माहिती दिल.
दरम्यान, वन विभागाने गेल्या वर्षी पायवाटेवर असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे परिसरात विक्रेते दिसून येत नाहीत. जर विक्रेत्यांची दुकाने असती, तर कदाचित ही घटना घडली नसती, अशी चर्चा केली जात आहे. कारण विक्रेते नसल्यामुळे तिथे वर्दळ कमी होती. या घटनेमुळे सिंहगड परिसरात फिरायला येणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. म्हणून या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहून आरोपींना तत्काळ अटक करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.