... म्हणून महाराष्ट्रातील मुलांची लग्न होत नाहीत, शरद पवारांनीचं सांगितलं राज'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 01:31 PM2023-01-05T13:31:53+5:302023-01-05T15:36:40+5:30
महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत.
पुणे - मुलांचे लग्न ही सध्याच्या समाजातील जटील समस्या बनली आहे. त्यामुळेच, सोलापूर जिल्ह्यातीलम मोहोळ येथील युवकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा काढला होता. लग्नासाठी पोरी मिळत नाहीत, म्हणत जिल्हाधिकारी महोदयांनीच आता आमच्याकडे लक्ष देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मुलांचे लग्न होत नसल्याचं कारण सांगितलं आहे.
महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात न्यायचे आणि नवीन उद्योग राज्यात येण्यास सवलती द्यायच्या नाहीत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. या कारणानेच महाराष्ट्रात तरुण मुलांची लग्नं होत नाहीत, असं परखड मत शरद पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात जनजागर यात्रा सुरु करण्यात आली आहे. पुण्यात या यात्रेचं उद्घाटन झाल्यानंतर शरद पवार बोलत होते. यावेळी, केंद्र आणि राज्य सरकारवरीही त्यांनी टीकास्त्र सोडले.
राज्य सरकारमधील एका मंत्र्याने राज्यातील काही महापुरुषांनी भीक मागून शाळा सुरु केल्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील नेते सोडा, सर्वसामान्य माणूसही कधी भीक मागत नाही. महाराष्ट्रीय माणूस हा श्रम करणारा आणि घामातून कमावणारा माणूस आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांचं नाव न घेत शरद पवारांनी लगावला.
संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात वावगं नाही
अजित पवारांचे संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिले; पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेले लिखाण कोणालाही पसंत पडणारे नाही; पण ते कधीकाळी लिहिलेले होते. ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र, संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही. काही नागरिक, व्यक्ती, घटक संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करतात, तर काही घटक संभाजीराजे यांच्याकडे धर्मवीर म्हणून पाहत असतील, तर त्याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले.