Pimpri Chinchwad: आयटी कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा; पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या
By प्रकाश गायकर | Published: July 8, 2023 05:55 PM2023-07-08T17:55:04+5:302023-07-08T17:58:02+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये ७० तरुणांकडून नोकरीला लावण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये उकळले होते...
पिंपरी : आयटी कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने मुसक्या आवळल्या. गेल्या काही दिवसांमध्ये ७० तरुणांकडून नोकरीला लावण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये उकळले होते. पोलिसांनी शनिवारी कारवाई करत चौघांना अटक केली. महेश कुमार हरिश्चंद्र कोळी (वय ३२, रा. सोमवार पेठ पुणे), अनोदीप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा (५२, रा. वाघोली) श्रावण एकनाथ शिंदे (३२, रा. वाघोली) व एक महिला आरोपी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी टेक्नॉलॉजी एस. ए. पी., एम. एम. व एम. के. मॅनेजमेंट सर्व्हिस नावाने महेश कुमार हा एजन्सी चालवत होता. त्यांनी विमाननगर व खराडी येथील आयटी कंपन्यांमध्ये जॉब लावण्याचे आमिष दाखवून ६० ते ७० मुला-मुलींकडून ५० लाख रुपये घेत बनावट नेमणूक पत्र देत त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. यामध्ये अनुदीप शर्मा याने त्याची बनावट कंपनी बनवून त्या कंपनीचे नेमणूकपत्र दिले होते. आरोपींवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे हे तपास करत आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलिस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, दादा पवार, पोलिस हवालदार प्रवीण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, पोलिस नाईक वासुदेव मुंडे यांनी केली.