जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने तरुणाची आत्महत्या
By विवेक भुसे | Published: September 14, 2022 04:28 PM2022-09-14T16:28:37+5:302022-09-14T16:29:31+5:30
जमिनीची मोबदला न देता केल्या खोट्या तक्रारी
पुणे: हिश्याची जमीन विकून त्याचा मोबदला न देता खोट्या तक्रारी केल्याचा प्रकार घडला. या त्रासाला कंटाळून महादेव मधुकर कोद्रे (वय ४०, रा. माळीनगर, बिजवडी पवार वस्ती, ता. माळसिरस, जि. सोलापूर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी प्रमिला महादेव कोद्रे (वय ४०) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी वसंत अनंत कोेद्रे (रा. हडपसर) व संभाजी जगन्नाथ कणसे (रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी प्रमिला कोद्रे यांचे वसंत कोद्रे हे भावकीमध्ये दीर आहेत. वसंत व त्यांचा मित्र संभाजी कणसे यांनी संगनमत करून गोड बोलून महादेव कोद्रे यांच्या हिश्याची मुुंढवा येथील जमीन विकली. त्याचा मोबदला म्हणून ९९ लाख रुपयांचा धनादेश दिला, परंतु हा धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत आला. याबाबत महादेव कोद्रे यांनी विचारणा करूनही पैसे न दिल्याने त्यांनी कोर्टात केस टाकतो, असे सांगितले. त्यावर राग येऊन दोघांनी महादेव कोद्रे यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या. आरोपींच्या या त्रासाला कंटाळून महादेव कोद्रे हे पुण्यात येऊन विश्रांतवाडी येथील भागीरथी सोसायटीत भाड्याने जागा घेऊन राहू लागले होते. तरीही त्यांचा त्रास कमी न झाल्याने त्यांनी या त्रासाला कंटाळून ११ ऑगस्ट रोजी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.