जेजुरी येथील नाझरे जलाशयात बुडून तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 09:40 PM2019-04-19T21:40:52+5:302019-04-19T21:43:52+5:30
खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेले कुटुंबीय नाझरे धरणात स्नानासाठी गेले असता त्यांच्या कुटुंबीयातील तरुणाचा बुडून मृत्यू झाला,
जेजुरी : खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेले कुटुंबीय नाझरे धरणात स्नानासाठी गेले असता त्यांच्या कुटुंबीयातील तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्याला वाचविण्यात यश आले. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी ७ च्या सुमारास घडली. राहुल शंकर पाटील (वय १८, रा. कुर्ला-नेहरूनगर, मुंबई) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रकाश सखाराम पाटील यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील यांच्या परिवारातील सदस्य जेजुरी येथे चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरीत आलेले होते. देवदर्शनापूर्वी सर्वजण मल्हारसागर जलाशयावर कऱ्हा स्नानासाठी गेले होते. प्रकाश पाटील यांचे दोन पुतणे रोहित शंकर पाटील व राहुल शंकर पाटील हे आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. पाटील परिवाराने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नागरिकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रोहितला वाचविण्यात यश आले. मात्र, राहुल पाण्यात बुडाला. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस व पोहणा-या माहितगारांच्या मदतीने शोध घेत सुमारे दोन तासानंतर राहुल पाटील याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार कदम तपास करीत आहेत.
.............
धरणात गाळयुक्त पाणीसाठा असल्याने भाविकांनी जलाशयात उतरू नये
७८८ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नाझरे जलाशयात केवळ ९५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असून हा मृतसाठा आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर खड्डे व गाळ असल्याने भाविकांना पाण्याचा अंदाज येत नाही. आजूबाजूच्या व्यावसायिकांनी भाविकांना समाजावून सांगितले तरी भाविक स्नानादीविधीच्या श्रद्धेपोटी दुर्लक्ष करतात. कृपया भाविकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन करणारे सूचना फलक पाटबंधारे विभागाकडून लावण्यात आल्याचे शाखा अभियंता शंकर चवलंग यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत शंभरहून अधिक भाविकांचा मल्हारसागर जलाशयात बुडून मृत्यू झाला आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी भाविकांच्या स्नानासाठी येथे घाट तयार करणे गरजेचे आहे.