डोक्यावरुन ट्रकचे चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:22 PM2018-04-24T13:22:50+5:302018-04-24T13:22:50+5:30
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारच्या चालकाने दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यामुळे दुचाकीसह तरूण रस्त्यावर पडला. याचवेळी अवजड ट्रकच्या चाकाखाली तो आल्याने जागीच मृत्यूमुखी पडला.
लोणी काळभोर : पुणे - सासवड राज्यमार्गावर कामावरून दुचाकीवर घरी परतत असलेल्या इंजिनियर तरुणाच्या दुचाकीला चारचाकीची धडक दिली. त्यामुळे इंंजिनिअर तरुण रस्त्यावर पडला. याचवेळी मागून आलेल्या अवजड ट्रकचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने हा तरूण जागीच मृत्यूमुखी पडला. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
वैभव नंदकुमार ऊबाळे ( वय २८, रा. हाडको, सासवड, ता. पुरंदर ) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाचा मोठा भाऊ विक्रम नंदकुमार ऊबाळे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हा होळकरवाडी ( ता. हवेली ) येथील कॉन्सुल निओव्हॅट या कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. तो कामावर ये - जा करण्यासाठी दुचाकीचा वापर करत असत. घटनेच्या दिवशी वैभव हा क्रमांक (एमएच १२ केएम ६१०६) या गाडीवरुन घरी येत असताना मागील बाजूने भरधाव वेगाने आलेल्या इंडिका (क्र.एमएच. १२. केएन. ८७१९)कारच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीच्या हॅन्डलला धडक दिली. यामुळे वैभव दुचाकीसह रस्त्यावर पडला. याचवेळी हडपसर कडून सासवड कडे निघालेला अवजड ट्रक(एमएच १२ सीटी ८६६१ )या ट्रकच्या चाकाखाली वैभव आल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेस कारणीभूत असलेले इंडिका व ट्रक वरील अज्ञात चालक तेथे न थांबता आपापली वाहने घेऊन निघून गेले. परंतू दोन्ही वाहनांचे क्रमांक मिळाले असल्याने त्यांच्यापर्यंत पोहचणे अवघड नसल्याचे पोलीसांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस करत आहे.