पुण्यात बंद लिफ्टमधून उतरताना डक्टमध्ये पडून तरुण ठार; वसतिगृह चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 10:01 AM2024-06-19T10:01:05+5:302024-06-19T10:01:57+5:30

या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी शिवाजीनगर भागातील एका वसतिगृहाच्या विश्वस्तांसह रखवालदार याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

Youth dies after falling into duct while getting off closed lift in Pune; A case has been registered against the hostel driver | पुण्यात बंद लिफ्टमधून उतरताना डक्टमध्ये पडून तरुण ठार; वसतिगृह चालकावर गुन्हा दाखल

पुण्यात बंद लिफ्टमधून उतरताना डक्टमध्ये पडून तरुण ठार; वसतिगृह चालकावर गुन्हा दाखल

पुणे : बंद पडलेल्या लिफ्टमधून उतरताना मोकळ्या जागेत (डक्ट) पडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी शिवाजीनगर भागातील एका वसतिगृहाच्या विश्वस्तांसह रखवालदार याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय अशोक मिरांडे (वय १९, मूळ रा. वैष्णवी बंगला, सावेडी, अहमदनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे विश्वस्त, वसतिगृह पर्यवेक्षक यांसह रखवालदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध (भादंवि ३०४ अ), तसेच ३४ या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अजयचे वडील अशोक मदनलाल मिरांडे (वय ५५) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, घोले रस्त्यावर जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे वसतिगृह आहे. १५ मार्च रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास अजय आणि त्याचे मित्र लिफ्टमधून निघाले होते. त्यावेळी लिफ्ट बंद पडली. रखवालदाराने लिफ्ट बंद पडल्यानंतर मुलांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले नाही. अजयला लिफ्टच्या डक्टमध्ये उडी मारून उतरण्यास सांगितले. अजयने उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. लिफ्टमधील मुलांना बाहेर काढण्यासाठी पर्यवेक्षक यांनी योग्य त्या सूचना दिल्या नव्हत्या. त्यांना याबाबतचे मार्गदर्शन वसतिगृहातील रखवालदारास दिले नसल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर मोतीवाला यांच्यासह रखवालदार तसेच विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अजित बडे करीत आहेत.

Web Title: Youth dies after falling into duct while getting off closed lift in Pune; A case has been registered against the hostel driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.