तरुणांचं राॅबिन हुड काम ; वंचितांना केले फराळाचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 04:31 PM2018-11-05T16:31:46+5:302018-11-05T18:16:10+5:30
वंचितांसठी दिवाळी सण विस्मरणीय करण्याचं काम पुण्यातील राॅबिन हुड अार्मी या संस्थेचे तरुण करत अाहेत. हे तरुण फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचे फराळ वाटून त्यांची दिवाळी गाेड करत अाहेत.
पुणे : दिवाळी सण हा अानंदाचा, चैतन्याचा सण असला तरी प्रत्येकाच्या वाट्याला अानंद येताेच असं नाही. वंचितांसठी हा दिवाळी सण विस्मरणीय करण्याचं काम पुण्यातील राॅबिन हुड अार्मी या संस्थेचे तरुण करत अाहेत. हे तरुण फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचे फराळ वाटून त्यांची दिवाळी गाेड करत अाहेत.
भारतातील विविध शहरांमध्ये राॅबिन हुड संस्थेकडून काम केले जाते. दरवर्षी दिवाळी निमित्त या संस्थेकडून गरजू नागरिकांना दिवाळीच्या फराळाचे वाटप केले जाते. यंदा संस्थेच्या स्वयंसेवकांनी अाणलेले फराळ पुणे महानगरपालिकेजवळ फुटपाथवर राहणाऱ्या लाेकांना वाटण्यात अाले. माेठ्या प्रमाणावर गाेळा झालेले फराळ विविध पिशव्यांमध्ये भरुन वाटण्यात अाले. या उपक्रमाविषयी बाेलताना राॅबिन हुड संस्थेची स्वयंसेविका म्हणाली, दरवर्षी अाम्ही वंचितांची दिवाळी गाेड व्हावी यासाठी फराळाचे वाटप करत असताे. यंदाही अाम्ही या ठिकाणी फराळाचे वाटप करत अाहाेत. अामच्या संस्थेमध्ये जास्त संख्या ही तरुणांची असून अाम्ही स्वयंस्फुर्तीने प्रत्येक उपक्रमात सहभाग घेत असताे. यातील अनेकजण हे महाविद्यालय, काम संभाळून या सामाजिक कामात हातभार लावत असतात.
राॅबिन हुड या संस्थेकडून हाॅटेल्समधील जास्तीचे अन्न हे गरीबांमध्ये वाटण्यात येते. पुण्यातील अनेक भागांमध्ये दर शनिवारी हे अन्न गरीबांमध्ये वाटण्यात येते. शहरातील विविध हाॅटेल्समधील जास्तीचे ताजे अन्न गाेळा करुन ते वाटण्यात येते. पुण्यातील शंभर ते दीडशे लाेकांना अन्न वाटप करण्यात येते. त्याचबराेबर वंचित मुलांना या संस्थेतर्फे शिक्षण सुद्धा देण्यात येते.