Pune: डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात बुडून पडून तरुणाचा मृत्यू, घोडेगाव परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:40 IST2024-05-14T16:38:28+5:302024-05-14T16:40:10+5:30
चास पांडुरंगवाडीजवळ कालव्यामध्ये असलेल्या मोटारच्या लोखंडी पाईप व वायरला एक मृतदेह अडकला असल्याचे दिसून आले...

Pune: डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात बुडून पडून तरुणाचा मृत्यू, घोडेगाव परिसरातील घटना
घोडेगाव (पुणे) : गिरवली (ता. आंबेगाव) येथील स्वप्निल शिवाजी सैद (वय २९) याचा डिंभे धरण डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. स्वप्निल सैद हरवला असल्याची फिर्याद भाऊ अजित शिवाजी सैद यांनी दि. १३ मे रोजी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली होती.
स्वप्निल हा भाड्याचे पैसे देण्यासाठी दत्तवाडीकडे दुचाकी (एमएच १४ - सीबी ०१७२) घेऊन गेला आहे. मात्र, तो अजूनही मिळून आला नाही, अशी माहिती दिली. त्यानंतर गावातील काही लोकांना स्वप्निल ज्या दुचाकीवरून जात होता ती दुचाकी कालव्याच्या कडेला मिळून आली. तेव्हापासून ग्रामस्थ व पोलिस त्याचा शोध घेत होते.
स्वप्निल सैद याला पोहता येत नव्हते. दरम्यान, दि. १४ मे रोजी चास पांडुरंगवाडीजवळ कालव्यामध्ये असलेल्या मोटारच्या लोखंडी पाईप व वायरला एक मृतदेह अडकला असल्याचे दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता हा मृतदेह स्वप्निल सैदचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनला याबाबत कळविले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संतोष मुळुक, बी.व्ही. वाघ करीत आहेत.