पाझर तलावात पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
By admin | Published: March 29, 2017 11:43 PM2017-03-29T23:43:48+5:302017-03-29T23:43:48+5:30
पुणे येथून आपल्या मित्रांबरोबर फिरण्यासाठी पुरंदर तालुक्यात आलेल्या युवकाच्या भिवरी येथील
गराडे : पुणे येथून आपल्या मित्रांबरोबर फिरण्यासाठी पुरंदर तालुक्यात आलेल्या युवकाच्या भिवरी येथील आंबराईवाडी पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अफशान सादिक शेख (वय २२, रा. कोंढवा खुर्द) असे या युवकाचे नाव असून रहिमान मौलाना शेख (वय ४५, घोरपडी पेठ) यांनी या घटनेची खबर सासवड पोलिसांना दिली आहे. दरम्यान बुडाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. शेख हा त्याच्या पाच मित्रांसह फिरण्यासाठी आला होता. दुपारी तीनच्या दरम्यान ते सारे बापदेव घाटाजवळच आंबराईवाडी तलावात पोहोण्यासाठी उतरले. अफशान बुडून दिसेनासा झाला. सर्व मित्र पाण्यातून बाहेर आले व त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना याबाबत कल्पना दिली. याबाबत सासवड पोलिसांना घटनेची माहिती दिली. भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते ८ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली. परंतु मृतदेह कोठेही सापडला नाही. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविली. अग्निशमन दलाचे जवान शिवतारे यांनी पाणबुडीच्या साह्याने शोधमोहीम सुरू केली. अखेर तिसऱ्या दिवशी बुधवार २९ रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना बोटीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.