'असा' फसला लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये शिरणारा तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:30 PM2018-12-25T12:30:30+5:302018-12-25T12:46:35+5:30
सुरक्षारक्षकाच्या चाणाक्षपणामुळे तरुणाला बेड्या
पुणे: लष्कराचा गणवेश घालून कमांड हॉस्पिटल परिसरात शिरणाऱ्या तरुणाला वानवडी पोलिसांनी अटक केली. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये आपली निवड झाल्याचं दाखवण्यासाठी या तरुणानं लष्कराचा गणवेश तयार करुन घेतल्याची माहिती चौकशीतून समोर आली. लष्करी वैद्यकीय विद्यार्थी असल्याचा बनाव करु पाहणाऱ्या या तरुणाला सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे अटक झाली.
आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाल्याचं दाखवण्यासाठी सय्यद जुनेद सय्यद अख्तर नावाच्या तरुणानं लष्कराचा गणवेश शिवून घेतला. 20 वर्षांचा जुनेद हा भुसावळचा रहिवासी आहे. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला, हे कुटुंबांना दाखवण्यासाठी त्यानं खोट्या शिक्क्यांच्या मदतीनं कागदपत्रं तयार केली. यानंतर त्यानं लष्करी विद्यार्थ्यांसारखा गणवेशदेखील शिवला. मात्र खांद्यावरची फित आणि पायातले बूट विद्यार्थ्यांशी जुळणारे नव्हते. नेमकी हीच बाब कमांड हॉस्पिटलच्या दरवाज्यावरील सुरक्षारक्षकानं हेरली आणि त्यानं सय्यदची चौकशी केली. त्याच्याकडे खोटी कागदपत्रं आढळल्यानं त्यानं याबद्दलची माहिती वानवडी पोलिसांना दिली.
चौकशीदरम्यान सय्यदकडे बोगस कागदपत्रं आणि ओळखपत्र आढळून आलं. सय्यद बारावी पास आहे. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं भासवण्यासाठी त्यानं हा सर्व उपद्वाप केल्याची माहिती चौकशीतून समोर आली. प्रवेशद्वारावर सय्यदला अडवणाऱ्या सुरक्षारक्षकानं याची माहिती वानवडी पोलिसांना दिली. यानंतर वनवाडी पोलिसांनी सय्यदला अटक केली. सय्यद दोनच दिवसांपूर्वी भुसावळहून पुण्याला आला. त्यानं आपलं सामान पुणे स्टेशनवरील क्लॉक रुममध्ये ठेवलं होतं. आपण एएफएमसीचे विद्यार्थी असल्याचं दाखवण्यासाठी तो सोमवारी सायंकाळी कमांड हॉस्पिटलमध्ये जात होता. त्यावेळी प्रवेशद्नारावरील सुरक्षा रक्षकाला संशय आल्याने त्यांनी हटकलं. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला काहीच सांगता येत नव्हतं. त्यामुळे लष्कर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिलं.