देव तारी त्याला काेण मारी ; पुलावरुन पडूनही युवकाचे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 09:46 PM2019-08-02T21:46:30+5:302019-08-02T21:47:43+5:30
पाेलिसांच्या सतर्कतेमुळे पुलावरुन पडलेल्या युवकाचे प्राण वाचल्याची घटना वारजे भागात घडली आहे.
वारजे : वेळ रात्री दोनची मुंबई बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर वारजे भागात एक युवक दोन पूलाच्या मधून खाली पडला असल्याची वर्दी नियंत्रण कक्षाला मिळते. त्यानुसार वारजे पोलिस ठाणे व वारजे वाहतूक विभागाचे पोलिस रात्री अडीचच्या सुमारास दोन्ही या भागात पाहणी करतात. त्यांना रात्री तीन च्या सुमारास नदीवरील पुलाच्या अलीकडे ओढ्यावरील पुलाजवळ दुचाकी दिसते. पण दोन्ही पूलाच्या मधून खाली पाहिले असता प्रचंड पाऊस त्यात अंधार, त्यामुळे बॅटरीची उजेड जाईल तिथ दगड गोटे, चिखल व झुडपेच दिसत होते. पोलिसांनी आवाज देऊन पाहिला पण कोणीतरी जखमी दुचाकीस्वारास दवाखान्यात नेले असेल या आशेवर त्यांनी रात्री शोध थांबविला.
भल्या पहाटे वारजे वाहतूक विभागाचे कर्मचारी डोंगरसिंह महाले, दिनेश सोनवणे तसेच पोलिस ठाण्याचे अधिकारी प्रशांत भोपळे रमेश क्षीरसागर, बाळासाहेब शिरसाठ, राहुल मोरे आदींनी पुन्हा घटना स्थळी शोध घेतला. त्यावेळी ओढ्याचे पानी कमी झाले होते. पोलिसांनी आवाज दिल्यावर अपघातग्रस्त दुचाकी चालक रविराज वडणे (वय २४ रा. सिंहगड रस्ता) यांनी पोलिसांना हात उंचावून आपण आतील बाजूस ब्लॉक वर पडल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पोलिसांनी प्रचंड अडचणीचा सामना करत चिखल माती, गवत, दगडी, झुडुपे, ओढ्यातील गाळ यातून मार्गक्रमण करत युवक पडलेला असलेला ठिकाण गाठले. डोक्याला व पायाला मार लागलेल्या अवस्थेत व चालताही येत नसल्याने त्यास खांद्यावर उचलून घेत परत महामार्गावर आणले व त्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांच्या या सतर्कतेने तसेच सदर युवकाने वाहन चालवताना डोक्याला हेलमेट लावले असल्याने त्याचे प्राण वाचण्यास मदत झाली. सुमारे २५ फुट उंचीवरून पूलाच्या पायाच्या सीमेंट ब्लॉक वर पडूनही हा युवक आश्चर्य कारकरित्या वाचला आहे. वारजे विभागाचे वाहतूक कर्मचारी डोंगर सिंह महाले म्हणाले, रात्री आम्ही दोन्ही पुलावर तसेच खालीही शोधण्याचा प्रयत्न केला. पण अंधार व प्रचंड पावसाने शोधकार्यांत अडचणी होत होत्या. त्यामुळे पहाटे उजाडल्यावर लगेच आम्ही घटनास्थळी गेलो. व त्यास शोधून वर आणले. त्यामुळे एखादयास वाचवण्याचे मोठे समाधान लाभले.