वडगावमध्ये युवकाची धारधार शस्त्राने हत्या; खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:39 IST2022-06-13T17:28:06+5:302022-06-13T17:39:44+5:30
मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास हत्या

वडगावमध्ये युवकाची धारधार शस्त्राने हत्या; खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण
वडगाव मावळ : वडगाव येथील एका युवकाची सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास लोखंडी कोयते व तलवारीने डोक्यात आणि अंगावर वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. तीन महिन्यातील दुसरा खून या प्रकरणी महेश काशिनाथ गायकवाड (वय २८,रा. वारंगवाडी) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विश्वजित राजेंद्र देशमुख (वय २२, रा. संस्कृती सोसायटी वडगाव ता. मावळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून महेश गायकवाड व अभिशेख अनंता ढोरे हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगावच्या हद्दीतील मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉपसमोर रोडवर पूर्वी झालेल्या कुठल्यातरी भांडणाच्या पूर्ववैमनस्यातून सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास १० ते १२ अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येऊन त्यांचे हातातील लोखंडी कोयते व तलवारीने विश्वजीत देशमुख याचे डोक्यात, पाठीवर वार करून त्यास जिवे ठार मारले. तसेच सदरची भांडणे सोडविण्यास गेलेल्या महेश गायकवाड (रा. वारंगवाडी) व अभिशेख अनंता ढोरे याचेवर देखील त्यांनी कोयत्याने व तलवारीने वार करून त्यांना जखमी केले आहे. तसेच त्यांच्या गाडयांची तोडफोड करून नुकसान केले असल्याची महेश गायकवाड याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनास्थळी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक दिपेश गट्टे, पोलिस उप अधिक्षक भाऊसाहेब ढोले, यांनी घटनास्थळी प्रत्येक्ष भेट देऊन पंचनामा करण्यात आला असून या गुन्ह्यातील पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास भोसले हे करत आहेत.