Pune Crime: मेसेज करून त्रास देत असल्याने बकोरीत तरुणाचा खून, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:35 PM2023-10-19T19:35:30+5:302023-10-19T19:36:17+5:30
याप्रकरणी चौघांवर खून, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली...
आव्हाळवाडी (पुणे) : सिमेंटचा पोल डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवर खून, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदरची घटना सोमवारी (दि.१६) रात्री साडेआठच्या सुमारास बकोरी गावातील वारघडे वस्ती येथे घडली. या घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
किसन नागनाथ पवार (वय ३७), बालाजी नागनाथ पवार (वय ३४), दिगंबर नागनाथ पवार (वय ३२, तिघेही रा. वारघडे वस्ती, बकोरी, ता. हवेली, जि. पुणे), सिद्धेश्वर नागनाथ काळुंके (वय २९, रा. साष्टे-कोलवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सुहास हरिदास शिंदे (रा. वारघडे वस्ती, बकोरी गाव, ता. हवेली) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संदीप हरिदास शिंदे आणि हरिदास केरबा शिंदे हे जखमी झाले असून याबाबत संदीप शिंदे यांचे फिर्यादीवरून लोणीकंद पोलिस ठाण्यात खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन पवार फिर्यादीच्या पत्नीला मोबाइलवर मेसेज करून त्रास देत असल्याने वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी जखमी व आरोपीत फिर्य़ादी यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. आरोपींनी फिर्यादी, त्यांचा मयत भाऊ व वडील यांना धक्काबुक्की करून मारहाण केली.
त्यावेळी किसन पवार याने घरासमोर पडलेला सिमेंटचा पोल सुहासच्या डोक्यात मारला. तर बालाजी पवार याने फिर्यादी व फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यात दगड व विटा मारून मारहाण केली, तर दिगंबर पवार याने फिर्यादी यांच्या वडिलांना लोखंडी हत्याराने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिघांवर उपचार सुरू असताना सुहास शिंदे याचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाचे सहा. पोलिस आयुक्त संजय पाटील, लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, सहा. पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, सहा. पोलिस निरीक्षक निखिल पवार, सहा. पोलिस निरीक्षक शिरीष भालेराव यांनी घटनास्थळाला भेट दिली. तपास पोलिस निरीक्षक मारुती पाटील करत आहेत.