पुण्यातील पद्मावतीमध्ये तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 08:45 AM2019-02-14T08:45:53+5:302019-02-14T08:59:03+5:30
पत्नीला शिवीगाळ का करतो, या कारणावरुन झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पुणे - पत्नीला शिवीगाळ का करतो, या कारणावरुन झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करुन त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पद्मावती येथील वीर लहुजी सोसायटीत बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.
मोहन शिवाजी गायकवाड (28) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी राकेश तुळशीराम पाटोळे, तुळशीराम पाटोळे आणि गणेश वैराट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन गायकवाड व सर्व आरोपी हे वीर लहुजी सोसायटीत जवळ जवळ राहतात. दोन दिवसांपूर्वी ते सर्व जण कोल्हापूरला गेले होते. तेथून बुधवारी सकाळी परत आले. त्यानंतर सायंकाळी मोहन गायकवाड हा सोसायटीत बसला असताना राकेश, त्याचे वडील तुळशीराम पाटोळे आणि गणेश वैराट तेथे आले. तेव्हा राकेश याने माझ्या पत्नीला शिवीगाळ का करतो, असे विचारले. यावरुन त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा तिघांनी मोहनला मारहाण केली. लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला. त्यात मोहन रक्तभंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, खूप रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असताना पहाटे 2 वाजता त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी घटनास्थळाला भेट दिली. मोहन व आरोपी हे कोल्हापूरला गेले असताना तेथे काही घडले असण्याची शक्यता आहे. त्यावरुन त्यांच्यात वाद होऊन हा प्रकार झाला आहे. तुळशीराम पाटोळे यांना ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा शोध घेत असल्याचे बच्चनसिंग यांनी सांगितले.