युवा संसदेचे शनिवारी उद्घाटन
By admin | Published: January 25, 2017 02:27 AM2017-01-25T02:27:18+5:302017-01-25T02:27:18+5:30
नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या युवा संसदेचे उद्घाटन येत्या शनिवारी
पुणे : नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या युवा संसदेचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. २८) सकाळी १० वाजता होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या युवा संसदेत युवकांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे, असे युवा संसदेचे संस्थापक-अध्यक्ष शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संसदेचे उद््घाटन माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. असे नमूद करून शार्दूल जाधवर म्हणाले, ‘‘कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, तसेच रक्षा खडसे व डॉ. प्रीतम मुंडे यांना आदर्श खासदार पुरस्कार, भीमराव तापकीर यांना आदर्श आमदार पुरस्कार, कांताताई दगडी यांना आदर्श सरपंच पुरस्कार तसेच प्रवीण निकम यांना आदर्श युवा पुरस्कार दिला जाणार आहे.’’
महाराष्ट्रासह गोवा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड विविध राज्यांतून सुमारे २ हजार युवक संसदेसाठी पुण्यात येणार आहेत. त्यांना ‘सामाजिक चळवळ आणि युवक’, ‘अभिव्यक्ती- देशभक्ती आणि देशद्रोह’, ‘राजकारण आणि नैतिकता’ या विषयावर विविध क्षेत्रांतील वक्ते मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, दहशतवाद विरोधी पथकाचे भानुप्रताप बर्गे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनायक मेटे, नेहरू युवा संघटनेचे संचालक मेजर जनरल दिलावर सिंग आदी मनोगत व्यक्त करणार आहेत, असेही जाधवर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)