मतदान हक्कासाठी तरुण सज्ज; मतदार नोंदणीत तब्बल एक हजार जणांचा सहभाग
By नितीन चौधरी | Published: December 4, 2023 07:11 PM2023-12-04T19:11:05+5:302023-12-04T19:11:48+5:30
‘स्वीप’अंतर्गत राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे एकत्रित प्रयत्न यामुळे मतदार नोंदणीला वाढता प्रतिसाद
पुणे : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात शनिवारी व रविवारी आयोजित मतदार नोंदणी शिबिरात ५ हजार ६४८ मतदारांची नोंदणी करण्यात आली. यात ४८९ महिला, १ हजार ७४ तरुणांचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत अधिकाधिक पात्र मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विविध उपक्रम राबवून मतदार नोंदणीला गती देण्यास प्रोत्साहन देत आहेत. पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नाविन्यपूर्ण कल्पना राबवत मतदार जागृती आणि मतदार नोंदणीवर भर दिला आहे. ‘स्वीप’अंतर्गत राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे एकत्रित प्रयत्न यामुळे मतदार नोंदणीला वाढता प्रतिसाद मिळतो आहे.
मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नागरिकांकडून मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती वा वगळणीचे अर्ज ९ डिसेंबर पर्यंत मागविण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाचे महिला तसेच तृतीयपंथीय, देहविक्री व्यवसायातील महिला, आणि भटक्या व विमुक्त जमाती या उपेक्षित घटकांच्या मतदार नोंदणीवर भर देण्याचे निर्देश असून त्यानुसार या शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
दोन दिवसीय विशेष शिबिरात ४८९ महिला, ९० देहविक्रय व्यवसायातील महिला, ९७ तृतीयंथीय, भटक्या जमातीचे १२१, दिव्यांग ४२३, तरुण १ हजार ७४ तर सर्वसाधारण मतदार ३ हजार ३५४ याप्रमाणे एकूण ५ हजार ६४८ मतदारांची नोंदणी करण्यात आली.
‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमातून जनजागृती केल्यामुळे मतदार नोंदणी कामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठांच्या माध्यमातून महाविद्यालयांपर्यंत पाहोचून तेथे शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून युवकांनी ऑनलाईन नोंदणी करुन आजचा युवक ‘टेक्नोसॅव्ही’ असल्याचे दाखवून दिले आहे. जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. - अर्चना तांबे, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी