तरुणांनी वणव्यातून शेकडो झाडे वाचविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:48+5:302021-03-07T04:10:48+5:30
मंचर:धामणी, ता. आंबेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात बोल्हाईचा माळ या डोंगराळ भागात लागलेल्या वणव्यामुळे शेकडो ...
मंचर:धामणी, ता. आंबेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात बोल्हाईचा माळ या डोंगराळ भागात लागलेल्या वणव्यामुळे शेकडो झाडे जळून भस्मसात झाली असती. मात्र, स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधानामुळे शेकडो झाडे आगीपासून वाचवण्यात तरुणांना यश आले आहे. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या उक्तीचा अनुभव धामणी ग्रामस्थांना आला.
धामणी गावातील खंडोबा मंदिर परिसरातील लोणी रोडला असणाऱ्या बोल्हाईचा माळ या डोंगराला आग लागली होती. दीपक जाधव या तरुणाने सरपंच सागर जाधव यांना फोनवरून ही माहिती दिली. गावातील तरुणांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली.त्या ठिकाणी मागच्या पावसाळ्यात लावलेली ३५० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडता पडता वाचली आहेत.
सरपंच सागर जाधव,शाखाप्रमुख दीपक जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय राजे विधाटे, माधव बोऱ्हाडे, बंटी जाधव, बापू जाधव, विजय पंचरास, शिवाजी भंडारकर, क्रांतिक रोडे, लालू जाधव, संकेत जगदाळे यांनी जिवाची बाजी लावून भडकणारी आग लिंबाच्या झाडाचा पाला, तरवडाच्या पाल्याच्या सहाय्याने विझवली. हे करत असताना तरुणांना थोडी इजा झाली. परंतु तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष करुन आगीवर नियंत्रण मिळवले.
तरुणांनी केलेल्या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे. अशा लागणाऱ्या आगी किंवा समाजकंटकांनी लावलेल्या आगीमुळे रानातील गवत, वृक्ष, प्राणी, जिवजंतू आगीत होरपळून निसर्गाचा ऱ्हास होत आहे. कृपा करुन अशा गोष्टी निदर्शनास आल्यावर लगेच कॉल करा जेणेकरून आग भडकणार नाही. आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता येईल. असेेेे आवाहन सरपंच सागर जाधव यांनी केले आहे.