पुण्यातील युवा संशोधकाची आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 12:57 PM2020-02-11T12:57:17+5:302020-02-11T13:03:06+5:30
मूळ पेशी पुनरुज्जीवनासाठी केलेल्या संशोधनामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुलभ होण्यास सहाय्य होणार
पुणे : मूळ पेशींची (स्टेम सेल) कार्यक्षमता वाढण्याच्यादृष्टीने पुण्यातील डॉ. रोहन कुलकर्णी या तरुण संशोधकाने उपयुक्त संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. मूळ पेशी पुनरुज्जीवनासाठी केलेल्या संशोधनामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुलभ होण्यास सहाय्य होणार आहे. याबद्दल त्यांना जागतिक पातळीवरील स्टेम सेल्स यंग इन्व्हेस्टिगेटर अॅवॉर्ड (तरुण संशोधक पुरस्कार) जाहीर झाला आहे. जागतिक पातळीवर महत्त्वाचे ठरलेले हे संशोधन डॉ. रोहन कुलकर्णी यांनी राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स) येथे केले आहे.
शरीरातील मूळ पेशींवरील संशोधनकार्यासाठी वाहिलेल्या स्टेम सेल्स या नामांकित नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या शोधनिबंधाचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला आहे. शरीरामध्ये रक्तनिर्मितीचे महत्त्वाचे कार्य रक्ताच्या मूळ पेशी करीत असतात. या पेशींचा उपयोग कर्करोग व इतर दुर्धर आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. वृद्ध लोकांमधील या पेशींची कार्यक्षमता कमी असल्याने उपचारांसाठी त्या निरुपयोगी ठरतात. पुनरुज्जीवनाद्वारे मूळ पेशींकरिता अधिक दाते उपलब्ध करून गरजू रुग्णांना उपचार मिळावे, असे या संशोधनाचे उद्दिष्ट होते. या मूळ पेशी पुनरुज्जीवनासाठी केलेल्या संशोधनामुळे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुलभ होण्यास सहाय्य होणार आहे.
डॉ. रोहन कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण दौंड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र येथे संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही पदवी प्राप्त केली आहे. यानंतर ते पुढील संशोधनाकरिता फ्रान्स येथे होते, तर सध्या ते अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आपले संशोधन करीत आहेत.
डॉ. कुलकर्णी यांना त्यांच्या रक्त निर्माण करणाऱ्या मूळ पेशींवरील अत्यंत महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान केला आहे. हा पुरस्कार व्हीले पब्लिशिंग हाऊस व अल्फा मेड प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. या संशोधनासाठी त्यांना डॉ. शेखर मांडे आणि डॉ. वैजयंती काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
.......
वृद्ध व्यक्तीच्या शरीरातील पेशी तरुण माणसाच्या शरीराच्या वातावरणात राहू शकतात का?
शरीरामध्ये मूळ पेशी (स्टेम सेल) महत्त्वाची भूमिका बजावत असतात. रक्ताचा कर्करोग झाल्यास पेशींची निर्मिती प्रक्रिया नियंत्रित राहत नाही. त्यामुळे बोन मॅरोसारखे आजार उद्भवतात. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी तरुण दात्याच्या शरीरातील मूळ पेशींची रुग्णाला गरज असते.
........
वृद्ध दात्याच्या मूळ पेशींची कार्यक्षमता कमी असते. संशोधनादरम्यान वृद्ध व्यक्तीच्या शरीरातील पेशी तरुण माणसाच्या शरीराच्या वातावरणात राहू शकतात का, याबाबतचा प्रयोग केला व त्यातून नवीन तंत्राचे संशोधन पार पडले.
.........
कर्करोगाशी संबंधित नवीन थेरपी विकसित करण्याच्या प्रक्रियेतील हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे परीक्षकांनी नमूद केले, अशी माहिती डॉ. रोहन कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
..............