युवकांनी आगीत शिरून वाचविले गर्भवतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:05 AM2017-08-15T00:05:47+5:302017-08-15T00:06:05+5:30
आगीत सारे काही भस्मसात होत असताना दोन युवकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या गर्भवती महिला व चिमुकलीचे प्राण वाचविले.
केडगाव : इमारतीला लागलेली भीषण आग.. एक गर्भवती महिला, तिच्यासोबत एक चिमुकली त्यात अडकलेली... आगीत सारे काही भस्मसात होत असताना दोन युवकांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या गर्भवती महिला व चिमुकलीचे प्राण वाचविले. प्राणांची शर्थ करून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या युवकांनी माणुसकीचा आदर्श त्यांनी घालून दिला.
केडगाव (ता. दौंड) येथे एका इमारतीला लागलेल्या आगीत २० लाख रुपयांचे सामान भस्मसात झाले. स्वातंत्र्यदिनाच्या आधी दुपारी २ युवकांनी जीव धोक्यात घालून एक गर्भवती महिला व चिमुकलीला शिताफीने वाचविले. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. केडगाव येथील गजबजलेल्या बाजारपेठेत नाज या दुकानाच्या तळमजल्यावरून धुराचे लोट दिसू लागले. हे दुकान हरुण आतार यांचे आहे. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी. पत्नी आजारी असल्याने त्यांना घेऊन बाहेरगावी गेले होते. त्यांचा मुलगाही बाहेरगावी गेला होता. आगीने रुद्रावतार धारण केला. त्यानंतर परिसरात एकच धावपळ सुरू झाली. काही तत्पर व जागरुक नागरिकांनी स्वत:चे पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तरीही आग विझण्याऐवजी भडकत होती. या वेळी ग्रामस्थांपैकी काहींना या इमारतीत कोण अडकले का? अशी शंका आली. आतार यांचे कुटुंब तिसºया मजल्यावर असण्याची शक्यता वर्तविली. गर्दीतील नितीन शेळके व इरफान तांबोळी हे दोन युवक पुढे सरसावले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शेजारील घराच्या टेरेसवर गेले. या इमारतीवरून उडी मारून दोघे जण आग लागलेल्या इमारतीच्या तिसºया मजल्यावर आले. एव्हाना धुराचे लोट या मजल्यावर पोहोचलेले होते. आतून एका महिलेचा आवाज आला. या युवकांनी येथील आतार यांच्या स्नुषा खुशबू व त्यांची ३ वर्षांची चिमुकली हिला तत्काळ घरातून बाहेर काढले. धुरामुळे चिमुकली बेशुद्ध झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. रात्री मालक हरुण आतार यांनी फिर्याद दिली.
>मोलाची मदत : काही मिनिटांत अग्निशमन दल हजर
ग्रामस्थांनी तातडीने कुरकुंभ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. अवघ्या काही मिनिटांत अग्निशमन दल आल्यानंतर आग आटोक्यात आली. मदतीसाठी पोलीस हवालदार शशिकांत वाघ, डॉ. संदीप देशमुख, सतीश गुंदेचा, संजय हंडाळ, राजेंद्र शेळके, रविकांत जराड, मनोज गुंदेचा, अतुल पाटील, अझर इनामदार, मोमीन शेख, नावीद आतार, नितीन जगताप, किशोर निंबाळकर, साजिद शिकीलकर यांनी मोलाचे सहकार्य केले.