युवकांनी गावाशी अतूट नाते जोडावे
By admin | Published: December 23, 2016 12:30 AM2016-12-23T00:30:28+5:302016-12-23T00:30:28+5:30
देश बदलण्याची ताकत असलेल्या युवकांनो, देशासाठी आणि समाजासाठी काही तरी करून दाखवण्याचे हेच उमेदीचे वय आहे.
वाकड : देश बदलण्याची ताकत असलेल्या युवकांनो, देशासाठी आणि समाजासाठी काही तरी करून दाखवण्याचे हेच उमेदीचे वय आहे. त्यामुळे आपल्या वयाची काही वर्षे समाजासाठी खर्च करा आणि गावाशी नाते जोडून खेड्यांचा विकास करा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आयटी अभियंत्यांना केले.
हिंजवडीतील टेक महिंद्रा कंपनीतील संगणक अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यापासून पगारातील काही रक्कम जमा करीत नाम या संस्थेच्या कामात हातभार लावण्यासाठी ५० लाख रुपयांची मदत केली. तसेच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष श्रमदानाद्वारे १० हजार वृक्षलागवड केली अन् त्याची काळजी स्वत: कंपनी घेत आहे. या कामाचे कौतुक करण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोघे आले होते.
या वेळी ते अभियंत्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी नामचे महाराष्ट्रप्रमुख राजा शेळके, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जगदीश मित्रा, अभिजीत लाहिरी, सतीश पै उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन टेक महिंद्रा फाउंडेशनचे विजय वावरे, मनोज सकटे व कल्पना दिवाडकर यांनी केले.
(वार्ताहर)