तरुणाईने सुरु केला "अन्नदान यज्ञ"! कोरोनाच्या लढाईत गरजुंना मायेचा घास....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 06:36 PM2021-05-09T18:36:34+5:302021-05-09T18:36:39+5:30
शहरातील विविध भागात रस्त्यावरच्या निराधार, बेघर लोकांना, कुटुंबांना देता फूड पँकेट
पुणे: कोरोना काळात तरूणाई स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून स्वखर्चाने आणि स्वत:च्या हाताने जेवण तयार करून गरजुंना मायेचा घास भरवत आहे. या तरूणांनी हा ‘अन्नदान यज्ञ’ सुरू करून युवापिढीसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कोरोना ही एकट्या-दुकट्याची नव्हे तर सर्वांनी मिळून लढण्याची लढाई आहे. या तरूणांमध्ये कुणी डॉक्टर, वकील, तर आयटी इंजिनिअर आहेत. इतरांप्रमाणेच त्यांना देखील जीवाची भीती आहेच. पण त्याची पर्वा न करता समाजभान आणि संवेदनशीलतेतून त्यांनी हा ‘अन्नदान यज्ञ’ सुरू केला आहे.
याविषयी अँड अभिषेक जगताप यांनी ‘लोकमत’ला सांगितलं की, आम्ही सोसायटीतील वीस तरूण-तरूणींनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. सोसायटीमध्ये एक छोटासा हॉल आहे, तिथे आमच्यामधील सहा ते सात जण मिळून जेवण तयार करतात. त्यासाठी सकाळपासूनच तयारी सुरू होते. आम्ही सकाळी लवकर जाऊन मार्केटयार्ड येथून भाजीपाला आणतो, त्यानंतर भाजी निवडण्यापासून ते प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरूवात केली जाते. एका बॉक्समध्ये हे जेवण पँक केले जाते. आमच्यातलेच काही स्वयंसेवक स्वत: दुचाकीवर जाऊन शनिवारवाडा, कोथरूड, कँप आदी शहरातील विविध भागातील रस्त्यावरच्या निराधार, बेघर लोकांना, कुटुंबांना पँकेट देण्याचे काम करतात. दैनंदिन जवळपास ६०० ते ७०० फूड पँकेट तयार केली जातात.
सुरूवातीला आम्ही सर्वांनी पैसे गोळा केले आणि या उपक्रमाचा कामाचा श्रीगणेशा केला. आता अनेक मंडळी आम्हाला आपणहून पैसे देतात. पण आम्ही ते पैसे घेत नाही. उलट आम्हाला धान्य किंवा भाजीपाला आणून द्या आणि आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा असे सांगतो. याशिवाय आम्ही रस्त्यावर सोडलेल्या भाकड गाई, भटकी कुत्री, लहान पिल्लांना देखील खायला घालण्याचे काम करतो. हा उपक्रम हळू हळू वाढविण्याचा आमचा विचार आहे. या उपक्रमाला पोलिसांचे देखील सहकार्य मिळत आहे.
सर्व हॉटेल्स, दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावरच्या कुटुंबांना, मुलांना खायला काही मिळत नव्हते. किराणा मालाचे सामान दिले तर ते बनविणार कुठे? असा विचार मनात आला. मग आम्हीच जेवणाचे डबे तयार करून त्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. असे वकील अभिषेक जगताप यांनी सांगितले.