आईच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्येतून तरूणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:56 PM2018-04-12T13:56:34+5:302018-04-12T13:56:34+5:30
कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातच आईच्या आजारपणावर उपचारासाठी होणारा खर्च यामुळे आर्थिक ओढाताण होवू लागली.
पिंपरी : आईच्या गंभीर आजारामुळे आलेल्या नैराश्यातून २४ वर्षाच्या तरूण मुलाने आत्महत्या केली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री ताथवडे येथे उघडकीस आला. गौतम चंद्रकांत ठोसर (वय २४, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे, मूळ रा. सोलापूर), असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम त्याचा मोठा भाऊ आणि आई ताथवडे येथे राहतात. गौतम इलेक्ट्रिकलची कामे करतो. मागील काही वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्याने घरची जबाबदारी दोघा भावांवर आली. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईला गंभीर आजाराने ग्रासले. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यातच आईच्या आजारपणावर उपचारासाठी होणारा खर्च यामुळे आर्थिक ओढाताण होवू लागली. गौतमला नैराश्य आले. बुधवारी घरी कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारनंतर गौतमचा मोठा भाऊ घरी आला. त्याने दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. गौतमच्या भावाने मित्रांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला, त्यावेळी गौतमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.