पुरंदरमध्ये मराठा आरक्षणासाठी रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:35 PM2018-08-03T16:35:39+5:302018-08-03T20:28:03+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन पेटले असताना काही ठिकाणी आत्महत्येचे सत्र सुरु आहे.
पुरंदर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन पेटले असताना काही ठिकाणी आत्महत्येचे सत्र सुरु आहे. याचे लोण आता थेट पुणे जिल्हयापर्यंत पोहचले असून पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. दत्तात्रय तुकाराम शिंदे (वय ३४, सध्या रा.सासवड) असे या तरुणाचे नाव आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दत्तात्रय शिंदे यांनी पुणे -कोल्हापूर लोहमार्गावरील दौडज खिंडीत रेल्वेखाली शुक्रवारी (दि.३) सकाळी ६:२२ वाजण्याचे सुमारास आत्महत्या केली. याबाबत रेल्वे स्टेशनमास्टर विवेक यादव यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. खबरीनुसार जेजुरी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. मृत शिंदे यांचे खिशात सुसाईड नोट मिळाली असून या सुसाईड नोट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण तत्काळ मंजूर करावे अन्यथा ५ ऑगस्ट रोजी नीरा नदीत जलसमाधी घेणार आहे. माझ्या आत्महत्येस सर्वस्वी आपणच जबाबदार असाल असा मजकूर असलेली नोट मिळून आली आहे.
पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव आहे. कारगिल युद्धातील पहिले शहीद शंकर शिंदे यांचे हे गाव. याच गावातील मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने पिंगोरी, वाल्हे परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे. मयत दत्तात्रय शिंदे यांचेमागे चार वर्षाचा मुलगा, गर्भवती पत्नी, आई, एक अविवाहित भाऊ असा परिवार असून ते घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचे समजते. याप्रकरणी जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहे.