Pune: 'टास्क फ्रॉड' मध्ये तरुणाला ६ लाखांना गंडा; पाषाण परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: June 30, 2023 06:51 PM2023-06-30T18:51:36+5:302023-06-30T18:52:34+5:30
याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला आहे...
पुणे : वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना पाषाण परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवला आहे.
अविनाश बबनराव कांबळे (२५, रा. पाषाण) यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, कांबळे यांना अनोळखी क्रमांकावरून ‘दिलेला टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल’अशा आशयाचा मेसेज आला. त्यांनी तो टास्क पूर्ण केल्यावर सुरुवातीला कांबळे यांचा विश्वास संपादन करून, त्यानंतर वेगवेगळी कारणे देत त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
वेगवेगळी करणे देऊन सायबर चोरट्याने ५ लाख ८१ हजार रुपये उकळले. बराच कालावधी उलटला तरी गुंतवणूक केलेल्या पैशांचा मोबदला मिळाला नाही म्हणून विचारणा केली असता कांबळे यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ग्रुपमधून काढून टाकले म्हणून आपली फसवणूक झाल्याचे कांबळे यांच्या लक्षात आले. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत.