मराठी मुलीचे सरंक्षण करणे आमची जबाबदारी म्हणणाऱ्या भाईनेच केले तरुणाचे अपहरण
By विवेक भुसे | Published: August 20, 2022 07:28 PM2022-08-20T19:28:46+5:302022-08-20T19:30:02+5:30
खात्यातून पैसे काढून घेऊन २० लाखांची खंडणी मागितली...
पुणे : मराठी मुलींचे सरंक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे, असे म्हणणाऱ्या स्वयंघोषित भाईने ऑफिसमधील महिलेशी चॅट करतो, या कारणावरुन भेटायला बोलावून तिघांनी तरुणाचे अपहरण करुन त्याला कोपरगावला नेले. त्यांच्या खात्यातून पैसे काढून घेऊन २० लाखांची खंडणी मागितली. त्याने बाथरुमच्या बहाण्याने स्वत:ची सुटका करुन घेतली. शिर्डी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
लहु विष्णु जाधव (वय २९, रा. अहमदनगर), महेश भाऊसाहेब कोटमे (वय २७, रा. नाशिक) आणि मंगेश माणिक भाबड (वय ३७, रा. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी वाकड येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षाच्या तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खराडी बासपास येथे १७ ऑगस्ट रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याच्या ऑफिसमध्ये काम करणारी महिला हिचे सोबत फिर्यादी चॅटिंग करीत होते. त्यांना लहु जाधव याने फोन करुन तिचे सोबत चॅटिंग करु नको, असे सांगून खराडी येथे भेटायला बोलावले. त्यानुसार फिर्यादी हे गेले असताना त्यांच्या चारचाकीमध्ये लहु व महेश हे बसले. तुझे तिच्याबरोबरचे चॅट केलेले स्किन शॉट आमच्याकडे आहे. लहु जाधव हा तिथला भाई आहे, असे सांगून मराठी मुलींचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, असे सांगून लहू याने फिर्यादी त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेला.
तेव्हा त्यांच्याकडून फोन पेद्वारे १७ हजार रुपये घेतले. त्यांना मारहाण केली. फिर्यादीची कारची चावी व क्रेडिट कार्ड वापरुन मॉलमध्ये खरेदी केली. त्यानंतर त्यांना कोपरगाव येथे आणले. तेथे त्यांना डांबून ठेवले असताना त्यांनी बाथरुमला जाण्याचा बहाणा केला. त्यांची नजर चुकवून स्वत:ची सुटका करुन घेतले. शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तिघांना पकडून पुणे पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक रवी दळवी तपास करीत आहेत.
जीपीएसचा झाला फायदा
फिर्यादी तरुणाच्या कारला जीपीएस लावला होता. त्याने स्वत:ची सुटका करुन घेतल्यावर रिक्षातून पळून तो थेट शिर्डी पोलिसाकडे पोहचला. त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यांनी त्याच्या कारचे लोकेशन तपासले तेव्हा ती त्यांच्याच दिशने येत असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले.