पोलीस असल्याची बतावणी करून तरुणाला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:17+5:302021-04-18T04:09:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : क्राईम ब्रँच पोलीस असल्याची बतावणी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तरुणाला ३० लाखांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : क्राईम ब्रँच पोलीस असल्याची बतावणी करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तरुणाला ३० लाखांची मागणी करून लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे. या तोतयांनी या तरुणाला एटीएममध्ये नेऊन त्याच्या खात्यातून पैसे काढायला लावून लुबाडले.
याप्रकरणी धायरी येथील एका २४ वर्षांच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना राव नर्सिंग होम ते बोपदेव घाट तसेच कोंढव्यातील एटीएम सेंटरमध्ये ५ मार्च रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ दरम्यान घडली.
हा तरुण राव नर्सिंग होम येथे काम करतो. तोंडाला मास्क लावलेले दोघे व पांढरा स्कार्प बांधलेली महिला त्यांच्याकडे आली. तिने ते क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करून तुमच्याकडे चौकशी करायची आहे, असे सांगितले. या तरुणाला घेऊन ते तिघे बाजूच्या गल्लीत आले. तेथे तिघे जण उभे होते. त्यांनी फिर्यादीला रिक्षा बसवून शिवीगाळ करून मारहाण केली. ‘‘आम्ही सर्व पोलीस आहोत. तू हॉस्पिटलमध्ये पैशांचा अपहार करतोस. तुझ्याविरुद्ध पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करून तुला जेलला पाठवितो कसे बघ’’ अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला मोटारसायकलवर बसवून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. तू पैसे दिले नाही तर तुला जिवे ठार मारुन टाकीन, अशी धमकी दिली. तेव्हा फिर्यादी भीतीने पैसे देतो, असे बोलला. त्यानंतर कोंढव्यातील एटीएममध्ये त्यांनी फिर्यादीला नेले. तेथून ६५ हजार रुपये काढले व फिर्यादीचे एटीएम कार्ड घेतले. आता तू गप्प घरी जायचे़ जे काय झाले ते कोणाला सांगितलेस तर तुला आम्ही तू जिथे असशील तेथे येऊन ठार मारुन टाकेन, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या एटीएममधून १७ हजार रुपये काढून घेतले. भीतीमुळे फिर्यादीने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. त्यानंतर जाधव नाव सांगणा-याने फिर्यादीला फोन करुन आम्हाला बाकीचे पैसे दे जर पैसे नाहीस दिले तर तुला ठार मारुन टाकेन, अशी पुन्हा धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.