‘वाय-फाय’ अड्ड्यांवर तरुणांचा 'ठिय्या'; पुण्यात १५० ठिकाणी ‘वाय-फाय हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:19 PM2018-02-07T15:19:27+5:302018-02-07T15:23:47+5:30
स्मार्ट सिटी अतंर्गत शहरामध्ये सुमारे १५० ठिकाणी ‘वाय-फाय हॉटस्पॉट’चे बिटा व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. शहरातील ‘वाय-फाय’ अड्ड्यांवर तरुणांचा ठिय्या वाढू लागला आहे.
पुणे : स्मार्ट सिटी अतंर्गत शहरामध्ये सुमारे १५० ठिकाणी ‘वाय-फाय हॉटस्पॉट’चे बिटा व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. शहरातील ‘वाय-फाय’ अड्ड्यांवर तरुणांचा ठिय्या वाढू लागला असून, दैनंदिन कामकाज, आॅनलाईन संदेश पाठविणे, योजनांची माहिती घेणे, ई-बुक, व्हिडिओ पाहणे आणि परदेशातील आपल्या मुला-मुलींशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधणे आदी विविध कारणासाठी या वाय-फाय हॉटस्पॉटचा वापर नागरिक करू लागले आहेत.
शहरामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध १५० ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट सुरु करण्यात आले. एल अॅड टी रेलटेल यांच्या सहकार्याने शहरातील निवडक उद्याने, रुग्णालये, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालये आणि संग्रहालयांच्या ठिकाणी हे ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या या मोफत वाय-फायमुळे नेट सॅव्ही तरुणाईचा उत्साह चांगला वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
विद्यार्थी या ठिकाणी बसून, ‘बाय जू’, यूट्युब सारखे मोबाईबल अॅप्लिकेशनचा वापर करून अभ्यासासाठी अनेक मार्गदर्शक व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी वाय-फाय स्पॉटचा वापर करताना दिसत आहे. बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांचे सर्फिंग करणे, नोकरीसाठी बायोडेटा, अर्ज पाठविण्यासाठी उपयोग होत आहे. तर अनेक उद्यांनामध्ये ज्येष्ठ नागरिक आपल्या परदेशातील आप्तेष्टांशी व्हिडिओ कॉल करण्यासाठी वाय-फाय स्पॉटचा वापर करू लागले आहेत.
पोलीस स्टेशन व सरकारी कार्यालयांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा देण्यात आल्याने दाखल गुन्ह्यांची माहिती आॅनलाईन भरणे, पासपोर्ट व्हेरिफेकशन, आॅनलाईन तक्ररी तपासणे यासाठी उपयोग होऊ लागला आहे. तिकिटांचे आॅनलाईन बुकिंग, रेल्वेचे वेळापत्रक आदी विविध कामांसाठी देखील मोफत वाय-फायचा उपयोग होऊ लागला आहे.