सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी केल्यावरून तरूणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 04:12 PM2017-10-06T16:12:29+5:302017-10-06T16:17:26+5:30
सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी करण्याच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या दोन मुलांना मारहाण करीत एकावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रकार कोंढवा खुर्द रस्त्यावरील हमजा हेअर सलून दुकानासमोर दुपारी पावणेबारा वाजता घडला.
पुणे : सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी करण्याच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या दोन मुलांना मारहाण करीत एकावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रकार कोंढवा खुर्द रस्त्यावरील हमजा हेअर सलून दुकानासमोर दुपारी पावणेबारा वाजता घडला. याप्रकरणी सोसायटीमधीलच चार आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
सुददीन कुरेशी ( वय ३५, रा. आदितांश सोसायटी, कोंढवा खुर्द), रिवाज उर्फ युसुफ साबीर खान (वय ३६), महंमद मुदस्सर फैयाज अहमद पठाण (वय ३२) आणि जावेद हमीद इनामदार (वय ४४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आकीब अल्ताफ शेख (वय २६) असे खून झालेल्याचे तर ऐसर अल्ताफ शेख (वय १८) जखमी झालेल्याचे नाव आहे. अल्ताफ शेख (वय ५५, रा. स. नं ३८/१/३ पोकळे मळा, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र रफीक बाबू शेख हे आदितांश सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी करतात. या कारणावरून फिर्यादी यांचा मुलगा ऐसर हा दाढी करण्यासाठी सलूनच्या बाहेर उभे असताना सोसायटीमध्ये राहाणार्या आरोपींनी ऐसर याला तुझा बाप कोठे आहे? तो आमच्या सोसायटीमध्ये खूप मध्यस्थी करायला येतो. त्याला मस्ती आली आहे का? अशी विचारणा करून त्याला शिवीगाळ केली. तिथे फिर्यादी यांचा मुलगा आकीब आल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा भांडणे झाली. फिर्यादी हे त्यांची भांडणे सोडवायला गेले असता त्यांच्या दोन्ही मुलांना मारहाण करून ऐसरच्या छातीवर चाकूने वार करून त्याला जखमी केले तर आकीब याच्या हाताला धरून चाकू त्याच्या छातीत खुपसून त्याला ठार मारल्याने चौघा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड करीत आहेत.