पुण्यात तरुणांची टवाळखोरी; रंग टाकल्याचा जाब विचारला, अल्पवयीन मुलीसह तिघांवर कोयत्याने वार
By नितीश गोवंडे | Updated: March 17, 2025 17:05 IST2025-03-17T17:04:54+5:302025-03-17T17:05:07+5:30
काहीही कारण नसून अंगावर रंग टाकताना तिने नकार दिला असता या टवाळखोरांनी मारहाण करत मुलीवर कोयत्याने वार केले

पुण्यात तरुणांची टवाळखोरी; रंग टाकल्याचा जाब विचारला, अल्पवयीन मुलीसह तिघांवर कोयत्याने वार
पुणे : अंगावर रंग टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून टोळक्याने १५ वर्षीय मुलीसह तिच्या भावावर आणि मावस भावावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना १४ मार्च रोजी अडीचच्या सुमारास येरवडा परिसरातील भारतीय समाज मित्र मंडळाजवळ घडली. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. प्रेम विकी ससाणे (१८), आयान युनूस शेख (१९), रोनाल्ड उर्फ गुड्या विनोद आनंद (१८, सर्व रा. यशवंतनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गणेश संजय मातंग, रागिणी संजय मातंग आणि अमन अडागळे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अश्विनी संजय मातंग यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग कुटुंबीय येरवडा परिसरात राहायला असून, १४ मार्चला अश्विनीने तिची मुलगी रागिणीला दुकानातून साहित्य आणायला पाठवले होते. त्यावेळी चौकात बसलेल्या प्रेम, आयान, रोनाल्डने रागिणीच्या अंगावर रंग टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध करून आरडाओरड केली. त्यानंतर आरोपींना जाब विचारण्यासाठी गेलेल्या अश्विनीला त्यांनी शिवीगाळ केली. मुलगा गणेश, मुलगी रागिणी, अमन यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील यशवंतनगर येथे एक कुटुंब राहण्यास आहे. त्यांच्या घरात दोन मुली व एक मुलगी असा परिवार आहे. १४ मार्च रोजी सर्व घरी असताना १७ वर्षीय मोठ्या मुलीला किराणा सामान आणण्यासाठी तिच्या आईने घराजवळील दुकानात पाठवले होते. काही वेळातच घराबाहेर मोठ्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर घरातील सर्वजण बाहेर आली. त्यावेळी मुलीला विचारणा केल्यानंतर वस्तीतील प्रेम ससाणे व त्याचे मित्र बाहेर उभे होते. ते काहीही कारण नसताना अंगावर रंग टाकत असताना तिने त्यांना नकार दिला. त्यानंतर टोळक्याने तिला शिवीगाळ केली. याचवेळी टोळक्यातील एकाने १५ वर्षाच्या दुसऱ्या मुलीच्या पायावर कोयत्याने वार केले. तर अकरा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात दगड मारला तसेच हत्याराने मुलाच्या बोटावर मारत गंभीर जखमी केले. यावेळी अकरा वर्षाचा मुलगा चक्कर येऊन खाली पडला. यावेही मध्ये पडलेल्या फिर्यादीच्या बहिणीच्या मुलीलाही लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.