तरुणाईचा असंतोष रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 04:13 AM2018-02-09T04:13:34+5:302018-02-09T04:13:39+5:30
रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड नंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही गुरुवारी विद्यार्थ्यांनी लक्षणीय मोर्चा काढला.
पुणे : रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणाईने लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे. स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता दूर करावी, तसेच राज्यातील रिक्त पावणेदोन लाख पदे तातडीने भरावीत, आदी मागण्यासाठी औरंगाबाद, बीड नंतर विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातही गुरुवारी विद्यार्थ्यांनी लक्षणीय मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या या मागण्यांची सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर व्यापक लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शनिवारवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी मोर्चात सहभागी झाले होती. आम्ही अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे; मात्र आयोगाकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीने केला. पदांमध्ये वाढ करावी, संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीसारखी पीएसआय, सीटीआय आणि एसओची स्वतंत्र परीक्षा घेऊन जास्तीत जास्त जागांची जाहिरात काढण्यात यावी, एमपीएससीने बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घ्यावी, केंद्रावर मोबाईल जॅमर बसविण्यात यावेत, प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी न लावता तमिळनाडू पॅटर्न राबवावा, तलाठी पदाची परीक्षा एमपीएससीद्वारे घेण्यात यावी, डमी रॅकेट प्रकरणाची तपासणी सीबीआयमार्फत करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहे.