युवकांनो, हे वागणं बरं नव्हं!
By Admin | Published: March 2, 2016 01:01 AM2016-03-02T01:01:18+5:302016-03-02T01:01:18+5:30
निर्जनस्थळ तरुणी, महिलांसाठी असुरक्षित ठरू शकते, याचा प्रत्यय पुण्यातील हनुमान टेकडीवर एका तरुणीवर गुदरलेल्या प्रसंगाने आला
संजय माने , पिंपरी
निर्जनस्थळ तरुणी, महिलांसाठी असुरक्षित ठरू शकते, याचा प्रत्यय पुण्यातील हनुमान टेकडीवर एका तरुणीवर गुदरलेल्या प्रसंगाने आला. केवळ निर्जनस्थळच नव्हे, तर वर्दळीचे पिकनिक स्पॉट, त्या ठिकाणी तरुण-तरुणींनी बसण्यासाठी केलेल्या अडगळीच्या जागाही असुरक्षित ठरण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अशी दहा ठिकाणे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली आहेत.
निगडी-प्राधिकरण येथील दुर्गादेवी टेकडी, तसेच संभाजीनगर-चिंचवड येथील बर्ड व्हॅली हे पिकनिक स्पॉट शालेय, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमी युगुलांचे अड्डे बनले आहेत. सकाळी १०पासून ते सायंकाळी अंधार पडेपर्यंत प्रेमी युगुले त्या ठिकाणी झाडाझुडपांत, टेकड्यांवरील अडचणीच्या जागेत तासन् तास घालवतात. निगडीतील दुर्गादेवी टेकडीच्या परिसरात तर हे चित्र नित्याचेच आहे.
दुर्गादेवी टेकडीवर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यालगत दाट झाडी, वृक्षवल्ली आहे. हिरवळीचा छान परिसर असून, ज्या ठिकाणी बसण्यास जागा केली आहे, तेथे मात्र कोणी बसत नाही. काटेरी झुडपे, मोठ्या दगडांचा, घळीचा आडोसा अशी अडगळीची ठिकाणे या प्रेमी युगुलांनी निवडली आहेत. नागरिकांच्या वर्दळीचा पिकनिक स्पॉट असूनही त्या ठिकाणी प्रेमी युगुलांनी स्वत:च असुरक्षित ठिकाणांची निवड केली आहे. अडचणीच्या ठिकाणी साप, विंचवाची भीती आहेच; शिवाय अशा ठिकाणी कोणी त्यांच्यावर हल्ला केला, तरी कळणार नाही. अशा ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरप्रकार घडण्याची शक्यताही आहे. तसे घडल्याची उदाहरणेही आहेत. मात्र, ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या पद्धतीने घडला प्रकार निस्तरला जातो. त्याबद्दल कसलीही वाच्यता होत नाही. यदाकदाचित प्रकरण चव्हाट्यावर आलेच, तर त्याला वेगळा रंग दिला जातो.
दुर्गादेवी टेकडीवर तर अल्पवयीन शाळकरी मुली, मुलांबरोबर दप्तरासह आल्याचे पहावयास मिळाले. मित्र-मैत्रिण म्हणून जरी ते या परिसरात फिरण्यास आले असले, तरी आजुबाजूची दृश्ये पाहून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होणारच नाही, असे नाही. शाळेला दांडी मारून, पालकांची दिशाभूल करून आलेले हे विद्यार्थी स्वत:हून असुरक्षित ठिकाणी येऊन धोका पत्करू लागले आहेत. दुर्गादेवी टेकडी, तसेच बर्ड व्हॅली येथे कंत्राटदाराचे रखवालदार असले, तरी ते त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत नाहीत. गैरवर्तनाची शंका आली, तरी वैयक्तिक जीवनात ते हस्तक्षेप करीत नाहीत.
उद्यानात प्रवेशासाठी ओळखपत्र पाहण्याची गरज
प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटासाठी चित्रपटगृहात १८ वर्षे पूर्ण झाल्याचे खात्री करण्यासाठी ओळखपत्र पाहिले जाते. उद्यानात मात्र शाळकरी मुला-मुलींना, तेही शाळेच्या वेळेत प्रवेश दिला जातो. उद्यानात प्रवेश केल्यानंतर झाडा-झुडपांत प्रेमी युगुलांचे चाळे त्यांच्या सहज नजरेस येतात. एकतर उद्यानातील या गैरप्रकारांवर नियंत्रण आणले पाहिजे. नियंत्रण आणले जात नसेल, तर निदान शाळकरी मुला-मुलींना पालकांशिवाय त्रयस्थ व्यक्तीबरोबर प्रवेशास मज्जाव करावा. रंगतात. त्यामुळे हा परिसर रात्री महिलांच्या दृष्टीने अत्यंत असुरक्षित आहे.
मोबाइलवर काय पाहतात?
शाळेला, महाविद्यालयाला दांडी मारून उद्यानात तासन् तास घालवणारी अल्पवयीन मुले, मुली एकत्र बसून मोबाइलवर काय पाहतात, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. त्यांच्याकडील स्मार्ट फोनचा ते नेमका काय उपयोग करतात, झाडाच्या आडोशाला थांबून काय करतात, याकडेही लक्ष दिल्यास वेळीच गैरप्रकारांना आळा बसेल. हनुमान टेकडीसारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
> शहरातील दुर्गादेवी टेकडी आणि बर्ड व्हॅली या सहल केंद्राच्या ठिकाणी वर्दळ असतानाही ही ठिकाणे तरुणींसाठी असुरक्षित असल्याची परिस्थिती आहे. रावेत येथील पवना काठ परिसर आणि देहूरोडच्या पुढे असलेला घोरावडेश्वर डोंगर भाग ही निर्जन ठिकाणे तरुणींसाठी अत्यंत असुरक्षित ठरू शकणारी आहेत. शहराच्या बाहेर दूर अंतरावर निवांत ठिकाणी जायचे असे ठरवून अनेक तरुण-तरुणी घोरावडेश्वर डोंगरावर जातात.
डोंगराच्या पायथ्याला दुचाकी उभी करून पायवाटेने डोंगर चढून वर जावे लागते. येथील शिवमंदिरात सोमवारच्या दर्शनाव्यतिरिक्त अन्य दिवशी कोणीच फिरकत नाही. शाळा, महाविद्यालयाला दांडी मारून आलेल्या मुला-मुलींच्या जोड्यांचाच वावर या भागात दिसून आला.
> आकुर्डी रेल्वेस्थानकाच्या आजुबाजूच्या परिसरात निर्जन ठिकाणीही जोडप्यांचा वावर दिसला. प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी जोडपी फिरण्यास बाहेर पडतात. त्याच वेळी या परिसरात टवाळेखोर, मद्यपींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. चायनीज पदार्थ विक्रीच्या गाड्या, रेल्वे स्थानकाजवळील पुलाचा परिसर अशा ठिकाणी रात्री वाहने उभी करून मद्यपी उघड्यावर राजरोसपणे दारू पित बसलेले दिसले. त्यातच टवाळखोरी करणारे तरुणांचे टोळके या भागात दुचाकीचे स्टंट करीत होते. काहीजण तर या भागात वर्दळ नसलेल्या ठिकाणी चारचाकी वाहन उभे करून वाहनातच मद्यपान करीत होते. वाहनांमध्ये त्यांच्या ओल्या पार्ट्या रंगतात. त्यामुळे हा परिसर रात्री महिलांच्या दृष्टीने अत्यंत असुरक्षित आहे.
> दुर्गादेवी टेकडी, बर्ड व्हॅली या ठिकाणी काटेरी झुडपांत, मोठ्या दगडांच्या-खडकांच्या आडोशाची जागा निवडून तेथे बसलेल्या तरुण, तरुणींना साप, विंचू यापासूनही धोका संभवतो. अत्यंत अडचणीच्या ठिकाणी झुडपांमध्ये सर्पदंश झाल्यास जिवाला धोका होऊ शकतो. लोकांच्या नजरेस येणार नाही, अशा ठिकाणी बसल्याने त्यांना कोणी मदतही करू शकणार नाही. एखाद्या अनुचित प्रकाराशिवाय नैसर्गिक संकटही ओढावू शकते, याचे कसलेही भान न बाळगता आपल्याच धुंदीत प्रेमी युगुलांचा वावर दिसून येतो.