झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी युवा संघर्ष यात्रा- रोहित पवार

By विश्वास मोरे | Published: October 17, 2023 03:31 PM2023-10-17T15:31:41+5:302023-10-17T15:32:05+5:30

तरुणाच्या प्रश्नासाठी युवा संघर्ष यात्रा ....

Yuva Sangharsh Yatra to wake them up if they pretended to be asleep - Rohit Pawar | झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी युवा संघर्ष यात्रा- रोहित पवार

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी युवा संघर्ष यात्रा- रोहित पवार

पिंपरी : राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. झोपेचे सोंग घेतले असेल तर त्यांना जागे करण्यासाठी युवा संघर्ष यात्रा आहे, प्रश्नासाठी लढणं आपल्या हातात आहे, सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात रस नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी पिंपरीत दिली. 

घाबरतात ते तिकडे गेले!

पिंपरी चिंचवड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या गटात जे गेले. त्यांना घाबरविले जात असेल तर धाडस करा, लोकहितासाठी आपणाकडे येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असेही पवार म्हणाले.

कशासाठी आहे यात्रा....

आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील युवावर्ग हा एकूण लोकसंख्येच्या ४० टक्क्यापेक्षा जास्त असून तो आपल्या राज्याचे भविष्य आहे. अलिकडच्या काही वर्षांत युवांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी सरकारकडून आवश्यक तसे प्रोत्साहन मिळत नाही.  राज्यात बेरोजगारीचा वाढता दर, परीक्षा आयोजित करण्यात दीर्घकाळ होणारा विलंब, पेपरफुटी, अवाजवी परीक्षा शुल्क, कायमस्वरूपी पदवी कंत्राटी नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करू शकणारे राज्याचे हक्काचे मोठमोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे या आणि इतर असंख्य समस्यांनी युवांचे भविष्य धोक्यात आले आहे. यासाठी युवांनी एकत्रित येऊन सरकारला युवा कल्याणकारी धोरणे आखण्यास तसेच अतिशय महत्त्वाच्या अशा तरुण पिढीच्या आकांक्षा आणि कल्याणासाठी स्पष्टपणे अनुकूल निर्णय घेण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे, यासाठी तरुणाच्या प्रश्नासाठी युवा संघर्ष यात्रा आहे.

पवार म्हणाले, तरुणाच्या प्रश्नाबाबत अनेकदा अर्ज-विनंत्या केल्या किंबहुना धरणे, उपोषण अशी रस्त्यावरची लढाईही लढली. मात्र, सरकारच्या प्रतिसादात ठोस कृतीचा अभाव असल्याचे पाहायला मिळाले. सातत्याने युवांच्या प्रश्नाकडे राज्य शासन उदासीन असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील तमाम युवावर्गालाच रस्त्यावर उतरून राज्य पातळीवर सामूहिक आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे आणि यासाठीच युवा संघर्ष यात्रा आहे. ही पदयात्रा युवांनी सामूहिकपणे थेट रस्त्यावर उतरून युवाना प्रकर्षाने भेडसावणाऱ्या आव्हानांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येत आहे. यामुळे आपल्या न्याय्य मागण्यांचा लढा लढणान्या युवांचा संघटित आवाज अधिक बुलंद होण्यास निश्चित मदत होईल आणि या सामूहिक आवाजाची दखल सरकारलाही घ्यावी लागेल.

तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रतीकात्मक, शक्तिशाली साधन!

पवार म्हणाले, पदयात्रा युवांना संघटित करून एकत्रित आणण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रतीकात्मक परंतु शक्तिशाली साधन आहे. सरकारने निर्णायकपणे कार्य करणे आणि या विविध समस्यांचे त्वरित निराकरण करणे आवश्यक आहे, यावर या यात्रेत भर देण्यात येणार आहे.  युवा संघर्ष यात्रा ही युवा पिढीच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याला मूर्त रूप देण्यासाठी युवांनी सुरू केलेली एक प्रभावी चळवळ आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, रविकांत वरपे,  माजी नगरसेविका सुलक्षणा धर, युवा अध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक गणेश भोंडवे आदी उपस्थित होते.

Web Title: Yuva Sangharsh Yatra to wake them up if they pretended to be asleep - Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.