‘झालावारणा’ परंपरेला मिळाला उजाळा; लोकसंस्कृती जपण्यासाठी राजस्थानी महिलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:28 IST2018-02-23T13:17:06+5:302018-02-23T13:28:19+5:30
आपल्या पारंपरिक गोष्टींचा सगळ्यांनाच विसर पडू लागलाय. आपल्या पारंपरिक लोकसंस्कृती पुन्हा नव्या पिढीला समजावी, यासाठी राजस्थानी महिलांनी पुढाकार घेतला आहे.

‘झालावारणा’ परंपरेला मिळाला उजाळा; लोकसंस्कृती जपण्यासाठी राजस्थानी महिलांचा पुढाकार
पुणे : लग्न असो वा सणवार आजकल असले सारेकाही एक इव्हेंट म्हणूनच पुढं येऊ लागले आहे, अशाने आपल्या पारंपरिक गोष्टींचा सगळ्यांनाच विसर पडू लागलाय. आपल्या पारंपरिक लोकसंस्कृती पुन्हा नव्या पिढीला समजावी, यासाठी राजस्थानी महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी लोकसंगीतावर आधारित असलेला ‘झालावारणा’ ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे. लगीन गाण्यांवर आधारित ही संकल्पना आहे.
वाढत्या शहरीकरणाने व मॉल मल्टिप्लेक्सच्या संस्कृतीने तरुणाईवर मोठ्या प्रमाणात भुरळ घातल्याने आपले रीतभात ही कालौघात मागे पडत चालले आहेत. आपल्या या विसर पडलेल्या समृद्ध वारशाची ओळख समाजाच्या तरुण पिढीस व्हावी, यासाठी आता राजस्थानी महिलांनी पुढाकार घेतला असून लग्नकार्यातील शालीनपणा जपणाऱ्या उपक्रमांची फेर जुळवणीने त्यांनी याचा श्रीगणेशा केला आहे, लोकगीत आणि लोकसंगीतावर आधारीत झालावारणा ही विस्मरण होत चाललेली लगीन गाण्याची संकल्पना रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे.
याने संगीत रजनी या वारेमाप खर्चिक आणि आपल्या संस्कारात न बसणाऱ्या प्रकारातून शिरकाव होणाऱ्या अपप्रवृत्तीस आळा बसेल असाही त्यांचा विश्वास आहे, बना बन्नी अर्थात नवऱ्या मुला मुलींसाठी रीमाक झिमाक ठमाक ठम... तुम पर वारणाजी सरदार बना अशी मस्तीची पारंपरिक गाणी तसेच पिढ्यान्पिढ्या चालत आलेले आंगणा का गीत, शेवरा का गीत, बियाणा का गीत, रसबधाई का गीत, घोड्याका गीत, व्याहींची खोड काढत त्यांच्या उपहासासाठी गायिली जाणारी गाळ इत्यादीने लोप पावत असलेल्या आपली संस्कृतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत.
रीत महत्त्वाची का?
या रीती का महत्त्वाच्या आहेत, त्या मागील सामाजिक,भावनिक तसेच भौगोलिक कारणे काय आहेत, याचे शास्त्र ही समाजापुढे, विशेषत: युवांपुढे आणायला हवे, असाही त्यांचा मानस आहे.